जिल्हाधिकारी म्हणतात, बारामती तालुक्यातील लॉकडाउन या भागापुरताच  

मिलिंद संगई
Tuesday, 14 July 2020

बारामती शहरातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी नवल किशोर राम व पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अधिका-यांची बैठक घेऊन सूचना केल्या.

बारामती (पुणे) : बारामती शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात यावी व कोरोनाची साखळी तुटावी, या साठी बारामती शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आले आहे. लॉकडाउन फक्त बारामती शहरापुरताच मर्यादीत असून ग्रामीण भागात दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

अमोल कोल्हे यांच्या पंचसूत्रीचे पालन करा...कोरोनाला दूर रोखा....

बारामती शहरातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी नवल किशोर राम व पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी अधिका-यांची बैठक घेऊन सूचना केल्या. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, डॉ. मनोज खोमणे, डॉ. सदानंद काळे यांच्यासह अनेक अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. 

दौंडमधील या कुटुंबातील सहा जणांचे कोरोनाचे रिपोर्ट...

बारामती शहरातील औद्योगिक क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. कर्मचाऱ्यांना ये जा करण्याबाबत काय कार्यवाही करायची याबाबत निर्णय झाला असल्याचे जिल्हधिकारी राम म्हणाले. लग्नाला आता 50 ऐवजी 20 लोकांनाच परवानगी दिली जाणार आहे. ज्या ठिकाणी गर्दी होणार आहे, त्या ठिकाणी काही दिवस प्रतिबंध असतील. पहिले चार दिवस बारामती शहरात कडक लॉकडाउन होणार आहे, उर्वरित दिवस काही प्रमाणात शिथीलता दिली जाणार आहे. लोकांनी जी गर्दी केली आहे, त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली असल्याने थोडे निर्बंध घातले आहे. परिस्थिती पाहून लॉकडाउन उठवण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल दहा दिवसात ही साखळी तुटेल अशी अपेक्षा असल्याने दहा दिवसानंतर शिथीलता देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. 

जुन्नरमधील कोरोनाबाधितांसाठी एक हजार बेडची व्यवस्था

1000 बेडची तरतूद...
बारामतीत रुग्ण संख्या वाढली तर एक हजार रुग्णांना सामावून घेता येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे. गरज पडल्यास पाच दिवसात ही सोय आम्ही करू शकू. शहरातील व्हेंटीलेटर असलेली चार रुग्णालयांना ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया सुरु असून, रुग्णांना योग्य सेवा मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तपासणीसाठीचीही वेगळी व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक रुग्णाकडे लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. 
 
Edited by : Nilesh Shende


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Collector's review of Corona in Baramati city