महापूरानं वाहून गेलेले बंधारे बांधण्यासाठी 'डीपीसी'नं घेतला पुढाकार

Karha_River_Flood
Karha_River_Flood
Updated on

पुणे : कऱ्हामाईच्या महापुराला आता वरीस होत आलंया. गेल्या वरसी सप्टींबर महिन्यात मुसळधार पाऊस झाला अन् कऱ्हामाई दुथडी भरुन वाहू लागली. यामुळे काही कळायच्या आतच व्हत्याचं नव्हतं झालं. कुणाच्या हिरी, कुणाच्या हिरीवरल्या पाण्याच्या मोटारी, तर नदीवरील बंधारंही वाहून गेलं. यामुळं शेतीचं भयानक नुकसान झालं. हिरींचा पाण्याचा आधार गेल्यानं, हे सगळं घडलं, असे धालेवाडी (ता.पुरंदर) येथील ज्येष्ठ शेतकरी माधव कदम सांगत होते, पण आता हे वाहून गेलेले बंधारे पुर्ववत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने (डीपीसी) पुढाकार घेतला आहे. विशेष बाब म्हणून यंदा पहिल्यांदाच बंधारे दुरुस्तीसाठी डीपीसीचा निधी उपलब्ध होत आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे अनेक छोट्या पाटबंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापैकी काही बंधारे तर पूर्णपणे वाहून गेले आहेत. मात्र यासाठी कधीही डीपीसीकडून निधी दिला जात नाही. यंदा केवळ अपवादात्मक परिस्थितीत दिला जात आहे. 

यासाठी पुणे जिल्हा परिषदेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र दिले होते. केवळ १०० हेक्टर क्षेत्राच्या आतील बंधाऱ्यांचीच दुरुस्ती करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला आहे. मात्र पूर आणि पावसाने वाहून गेलेल्यांमध्ये १०१ ते २५० हेक्टरवरील बंधारे आहेत. त्यामुळे यासाठी डीपीसीतून निधी द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेने केली होती. यानुसार अजित पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना आदेश दिला होता.

जिल्हाधिकारी देशमुख यांनी जिल्ह्यातील ४६ बंधाऱ्यांना २ कोटी ९५ लाख २३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये पुरंदर, शिरूर, खेड आणि हवेली तालुक्यातील बंधाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी १३ बंधारे हे १०१ ते २५० हेक्टर क्षेत्राचे आहेत. या बंधाऱ्यांना १ कोटी ९४ लाख ८९ हजार रुपयांचा आणि अन्य विविध प्रकारच्या ३३ बंधाऱ्यांना १ कोटी ३४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

शंभर हेक्टरपुढील बंधारे

 - कुंभारवळण - १८ लाख ३६ हजार.

- एखतपूर - ३० लाख ३९ हजार.

- खानवडी - १८ लाख ८५ हजार.

- वाळूंज - १७ लाख १९ हजार.

- बेलसर - ३५ लाख ५७ हजार.

- कोथळे - १० लाख २६ हजार.

- पांडेश्वर - ९ लाख ४६ हजार.

- डोंगरगाव - २८ लाख २९ हजार.

- जातेगाव - ७ लाख १ हजार.

- तळेगाव ढमढेरे (किवटे मळा ) - ३ लाख ४२ हजार.

- तळेगाव ढमढेरे (सातपुते मळा) - ६ लाख १३ हजार.

- तळेगाव ढमढेरे (भैरवनाथ मंदिर) - ४ लाख २४ हजार.

- तळेगाव ढमढेरे (महाबळेश्वर मळा) - ५ लाख ७२ हजार.

बंधाऱ्यांमुळे विहिरांना बारमाही  पाणी उपलब्ध होत असते. मात्र ते बंधारे वाहून गेल्याने विहिरींमध्ये पाणीसाठा होऊ शकला नाही. त्याचा परिणाम पिके आणि उत्पादनांवर झाला. आता पुन्हा पुर्ववत पाणीसाठा होऊ शकेल.

- संभाजी काळाणे, उपसरपंच, धालेवाडी.

 - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com