सर्दी, तापाचे रुग्ण वाढले; घाबरू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या!

Cold-fever-patient
Cold-fever-patient
Updated on

पुणे - तुम्हाला सर्दी, ताप, खोकला झालाय? कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आलीय? या प्रश्नांची उत्तर ‘हो’ असतील तर घाबरून जाऊ नका. लगेच रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी बेडची शोधाशोध करू नका. सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी केले. कोरोना झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये या आजाराची ठळक लक्षणे दिसत नाहीत, काही रुग्णांमध्ये ही सौम्य लक्षणे दिसतात. काही रुग्णांचा ताप दोन ते तीन दिवस राहतो, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रूबी हॉल क्लिनिकचे डॉ. कपिल झिरपे म्हणाले, ‘‘कोरोनाच्या लाटेत संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. कुटुंबातील एक जणाला संसर्ग झाल्यास त्याच्यामुळे घरातील सर्वांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. पण, त्यामुळे अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णांवर घरात विलगिकरण करून यशस्वी उपचार केले जातात. त्यातील एखादाच रुग्णाला ऑक्सिजन लागतो. सद्यःस्थितीत रुग्णाला अतिदक्षता विभागाची गरज नाही, तर जास्तीत जास्त ऑक्सिजन आणि विलगिकरण बेडची आवश्यकता आहे.’

पुन्हा गरज विलगिकरण कक्षांची
तीन खोल्यांचे घर असलेल्या कुटुंबातील एक जणाला कोरोना झाल्यास त्याच्या विलगिकरणाची मोठी समस्या निर्माण होत आहे. महापालिकेची ‘कोविड केअर सेंटर’ (सीसीसी) सुरू नाहीत. सरकारी रुग्णालयात जागा नाहीत. मोजक्या खासगी रुग्णालयात फक्त अत्यवस्थ रुग्णांनाच दाखल करून घेतले जाते. अशा परिस्थितीत लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या कोरोनाबाधीतांसाठी विलगिकरण कक्ष उभारणे ही आता पुन्हा काळाची गरज असल्याचे मत वैद्यकक्षेत्रातून व्यक्त केले जात आहे.

घरात विलगिकरण होऊनही उपचार शक्य
कोरोनाचे निदान झाल्यानंतर प्रत्येक रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरात विलगिकरण होऊनही उपचार करता येतात. त्यामुळे रुग्णांनी आणि त्याच्या नातेवाइकांनी घाबरून जाऊ नये. डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याप्रमाणे औषधे घ्या. डॉक्टरांना आवश्यकता वाटल्यास ते तुम्हाला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देतील, असा विश्वासही शहरातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.

डॉक्टरांचे निरीक्षण 

  • रोज सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे असलेले ५० रुग्ण तपासल्यानंतर त्यातील ८० टक्के रुग्णांना कोरोनाचे निदान 
  • कोरोना निदान होणाऱ्यांमध्ये २० ते ४५ वयोगटातील नागरिकांचा समावेश
  • कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्यांना कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका
  • झोपडपट्टीपेक्षा मध्यमवर्गीय सोसायट्या आणि बंगल्यांमध्ये राहणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग

रोज सर्दी, ताप, खोकला असलेल्या बहुतांश रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान प्रयोगशाळेतून होत आहे. त्यात तरुणांचा समावेश असून, लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
- डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल सोसायटी, महाराष्ट्र शाखा

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com