...म्हणून तुषार गांधी आणि अन्वर राजन यांची व्याख्याने रद्द : डॉ. एकबोटे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

शैक्षणिक संकुल हे कुठल्याही राजकीय वादाचे केंद्र बनू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. 

औंध : तुषार गांधी आणि अन्वर राजन यांना या परिषदेत राजकीय भाष्य करू नये, अशी विनंती केली होती; परंतु 'गांधीजींच्या विचारांना राजकीय विषयापासून दूर करणार नाही,' यावर तुषार गांधी ठाम राहिले, त्यामुळे शैक्षणिक आवारात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता होती. हे टाळण्यासाठी गांधींना व्याख्यानास न येण्याची विनंती केल्याचा खुलासा प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉ. गजानन एकबोटे यांनी शनिवारी (ता.8) केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तुषार गांधी यांचे नियोजित व्याख्यान अचानक रद्द करण्यात आल्याने सध्या याविषयीची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत संस्थेची बाजू मांडण्यासाठी डॉ. एकबोटे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. 

- अभिनेत्री मानसी नाईकच्या छे़डछाडप्रकरणी एकाला अटक

डॉ. एकबोटे पुढे म्हणाले, 'रिव्हिजीटींग गांधी' या राष्ट्रीय परिषदेसाठी शैक्षणिक संस्थेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने निधी दिला होता. मात्र, हा निधी राजकीय कार्यक्रमासाठी वापरला जाऊ नये. तसेच महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींसह इतर वक्त्यांनी राजकीय भाष्य टाळावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. आणि असे आढळून आल्यास याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला होता.

- काळजी करू नका, हे आश्‍वासन नाही; तर ते माझे कर्तव्य : शरद पवार

गांधी आणि राजन यांच्या भाषणामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता अनेकांनी वर्तविली होती. त्यामुळे आम्ही सर्वांनी चर्चा करून आणि होणाऱ्या गोंधळाची कल्पना देत त्यांना व्याख्याानास न येण्याची विनंती केली, अशी माहिती डॉ. एकबोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळं त्या चिमुकल्याला मिळाला चेहरा!

व्याख्यान तात्पुरते स्थगित

''तुषार गांधींचे व्याख्यान हे तात्पुरते स्थगित केले आहे. त्यामुळे व्याख्यानासाठी त्यांना पुन्हा आमंत्रित केले जाणार आहे. महात्मा गांधींच्या जीवनावर होणारी परिषद वादग्रस्त होणे आम्हाला परवडणारे नसल्याने नियोजित व्याख्यान स्थगित करावे लागले; परंतु शिवाजीनगर शैक्षणिक संकुलात हे व्याख्यान पुन्हा आयोजित केले जाईल. शैक्षणिक संकुल हे कुठल्याही राजकीय वादाचे केंद्र बनू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला,'' असे स्पष्टीकरण डॉ. एकबोटे यांनी यावेळी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Gajanan Ekbote revealed about cancellation speech of Tushar Gandhi and Anwar Rajan in press conference