इंदापूरातील शेतकऱ्यांवर अस्मानीसोबत सुलतानी संकट; बागायती शेतीचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 June 2020

चार ते पाच दशकांपूर्वी महसूल व वन खाते एकत्र असताना शासनाने या जमिनी दिल्या होत्या. त्यांना ग्रामपंचायतीने मूलभूत सुविधा देखील दिल्या असताना ही कारवाई झाली.

इंदापूर : इंदापूर वनविभागाकडून तालुक्यातील गोखळी, राजवडी, भरणेवाडी या गावांमधील वन खात्याच्या जमिनीवर असलेली अतिक्रमणे काढण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा, पत्र्यांची बांधकामे, बागायती शेती याचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना महामारी सुरू असताना तसेच या खात्याचे मंत्री तथा लोकप्रतिनिधी तालुक्यात असताना देखील ही कारवाई झाल्याने अनेक शेतकरी बेघर झाले आहेत.

त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जबाबदारी समजून घेऊन न वागल्यास भविष्यात आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी वनखात्याच्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला. हर्षवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

- पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापुढे राहणार हवेलीकरांचे वर्चस्व; वाचा सविस्तर बातमी

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, ''लॉकडाऊनच्या काळामध्ये शासकीय वनअधिकार्‍यांनी गोर गरीब, मागासवर्गीय, भूमिहीन शेतकऱ्यांची घरे आणि शेती जेसीबी लावून उद्ध्वस्त केली. या कारवाईमुळे लोकांचा संसार उघड्यावर आला असून हे लोक बेघर झाले आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर या लोकांनी राहायचे कोठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. जेसीबी, पोकलेन आणि दोनशे एसआरपीचे जवान या ठिकाणी येऊन दडपशाही करतात हे चुकीचे आहे.

- काय सांगता? एका महिलेमुळं इंदापूरातील सहा गावे बफर झोनमध्ये!

चार ते पाच दशकांपूर्वी महसूल व वन खाते एकत्र असताना शासनाने या जमिनी दिल्या होत्या. त्यांना ग्रामपंचायतीने मूलभूत सुविधा देखील दिल्या असताना ही कारवाई झाली. त्यामुळे संबंधितांना ताबडतोब शासनाने निवारा उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यांना माणुसकीच्या भावनेतून पर्याय काढून द्यावा लागणार आहे. तसेच यासंदर्भात शासनाने सहा महिने कोणतीही कारवाई करू नये, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

 - परिस्थितीशी दोन हात करत पुण्यातील मोनिका बनली उपशिक्षण अधिकारी

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: encroachments removed by the Indapur Forest Department which has caused loss to the farmers