गावापासून शहरापर्यंत सगळीकडेच शोषण!

Jatpanchyat
Jatpanchyat

अनेक समाजांत आजही जातपंचायती कार्यरत आहेत. कायद्याचे निर्बंध झुगारून त्या स्वतःचे कायदे समाजावर लादताहेत. त्यातून अघोऱ्या शिक्षेपासून बहिष्कृत करण्यापर्यंत पाऊल उचलले जाते. यात सर्वाधिक महिलाच भरडल्या जाताहेत. जातपंचायतीच्या या विळख्यातून समाजाची सुटका करण्यासाठी विविध सामाजिक संस्था आपापल्या परीने लढताहेत. त्यांचा लढा आणि जातपंचायतीच्या अनिष्ट व्यवस्थेवर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून...

पुणे - वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क सांगितल्याने भातू समाजाच्या जातपंचायतीमध्ये पंचांनी मुली व त्यांच्या आईला समाजातून एक वर्षासाठी बहिष्कृत केल्याची घटना नुकतीच सासवडमध्ये घडली. तर कौमार्य चाचणीमध्ये मुलीला दोषी ठरवीत जातपंचायतीच्या सांगण्यावरून बेळगावमध्ये दिलेल्या दोन सख्ख्या बहिणींना त्यांच्या पतींनी सोडून दिल्याचा प्रकार घडला आहे. अशा असंख्य घटना खेड्यापाड्यांसह पुणे, मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरात अजूनही घडत आहेत. बेकायदा व छुप्या पद्धतीने चालणाऱ्या या जातपंचायतींकडून महिलांची पिळवणूक होत असल्याचे वास्तव आहे. जातपंचायतींच्या दहशतीमुळे अनेक प्रकरणे पुढे येत नसल्याची सद्यःस्थिती आहे. 

राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध जाती-जमाती आपापल्या पद्धती, रीतिरिवाज, परंपरेप्रमाणे जीवन जगत आहेत. असे असले तरीही अनेक ठिकाणी जातपंचायतीचे मूळ अद्यापही नष्ट झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे. जातपंचायतीच्या माध्यमातून संबंधित समाजाचा कारभार हाकण्याचे काम ठराविक व्यक्ती करीत आहेत. याच व्यक्ती व त्यांच्या जातपंचायतींमधील सदस्यांकडून महिलांना सर्वाधिक त्रास दिला जात असल्याची सद्यःस्थिती आहे.

जातपंचायतीच्या बळी ठरलेल्या महिलांनी त्यांच्या समस्या समाजापुढे मांडल्या. जातपंचायती भ्रूण अवस्थेपासूनच स्त्रियांचे हक्क हिरावून घेतात. वयाच्या १०-१५ व्या वर्षीच त्यांचे त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या व्यक्तींशी लग्न लावून दिले जाते. मुलीने शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास तिला शिक्षणापासूनही परावृत्त केले जाते.

लग्नाच्या वेळी पंच, आईवडील, नातेवाइकांच्या उपस्थितीत मुलींची क्रूर पद्धतीने कौमार्य चाचणी घेतली जाते. त्यामध्ये ‘माल खरा आहे की खोटा’ अशी भाषा वापरीत जातपंचायतीचे पंच महिलांना दोषी ठरवितात. हे क्रूर प्रकार इथेच थांबत नाहीत, तर महिलेला मूल झाल्यानंतरही तिचे चारित्र्य चांगले आहे, की वाईट हे ठरविण्यासाठी तिच्या मुलाच्या कोवळ्या तळहातावर पेटते निखारे ठेवले जातात. तळहातावर फोड आले तर महिलेस चारित्र्यहीन ठरवून शिक्षा दिली जाते. विशेषतः महिलेने आंतरजातीय विवाह केल्यानंतर वडिलांच्या मालमत्तेमध्ये हक्क सांगितल्यानंतर त्यांना समाजातून बहिष्कृत करण्याचे काम जातपंचायतीचे पंच करत असल्याचे वास्तव आहे. 

माझे सासरे वारल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीला व तिच्या मुलांना सासऱ्यांच्या मालमत्तेत वाटा मिळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. मात्र सासऱ्यांचे भाऊ, बहीण व जातपंचायतीला ते मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी माझ्या पत्नीला वडिलोपार्जित मालमत्ता मिळणार नसल्याचे सांगत जातपंचायतीमध्ये पंचांनी आम्हाला समाजातून एक वर्षासाठी बहिष्कृत केले होते. एक लाख रुपये दंड, पाच बोकड, पाच दारूच्या बाटल्या मागितल्या होत्या. त्या न दिल्यास कायमस्वरूपी बहिष्कृत करण्याची धमकी दिली होती.
- विकास कुंभार, पिडितेचे पती

जातपंचायतींमध्ये महिलाच सर्वाधिक शोषणाच्या बळी ठरतात. जातपंचायतीच्या पंचांकडून महिलांना लक्ष्य करून त्यांना त्यांच्या मूलभूत व न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवले जाते. त्यांच्यावर अतिशय क्रूरपणे अन्याय-अत्याचार केले जातात. आता कुठे अशा जातपंचायतींविरुद्ध काही नागरिक आवाज उठवीत आहेत; परंतु अजूनही त्यावर कायद्याचा वचक राहिलेला नाही.
- नंदिनी जाधव, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

जातपंचायतीची महिलांविषयी नियमावली
- अघोरी पद्धतीने होणारी मुलींची कौमार्य चाचणी  
- आंतरजातीय विवाहास कडाडून विरोध
- महिलांना वडिलांच्या मालमत्तांमध्ये हक्क नाकारणे
- कोणत्याही प्रकारच्या सण-समारंभामध्ये जाण्यास मनाई  
- मुलींना दहावीनंतर शिक्षण घेण्यास मज्जाव  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील दोन जातपंचायती बरखास्त
पुण्यासारख्या शहरातही जातपंचायती आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या बेकायदा व चुकीच्या न्यायनिवाड्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल होते. संबंधित दोन्ही गुन्ह्यांमध्ये अंनिसने पोलिसांकडे पाठपुरावा केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई केली. या कारवाईमुळे अखेर संबंधित जातपंचायती बरखास्त करत असल्याचे त्यांच्या प्रमुखांनी स्पष्ट केले होते.

जातपंचायतीचे दाखल गुन्हे (२०१७ ते २०२०)
महाराष्ट्रात : ४०
पुण्यात : ०९

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com