Serum Institute Fire: मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत; सायरस पुनावालांनी केली घोषणा

टीम ई-सकाळ
Thursday, 21 January 2021

आगीच्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये तीन परप्रांतिय असून दोघे पुण्यातील असल्याचं समजते.

पुणे : सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत जीव गमवावा लागलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटने जाहीर केले.

'सीरम इन्स्टिट्यूटसाठी आजचा दिवस अतिशय दु:खदायक ठरला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कंपनी निकषांच्या अनिवार्य रकमेव्यतिरिक्त मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे,' अशी माहिती सीरमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला यांनी दिली. 

सीरम आग प्रकरणाचा क्राईम ब्राँचसुद्धा तपास करणार : पोलिस आयुक्त​

पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यू्टच्या इमारतीतल आज दुपारीच्या दीडच्या सुमारास आग लागली. त्यात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आगीतून पाच जणांची सुटका करण्यात यश आलं आहे. लस निर्मिती करणाऱ्या जगातील महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये सीरमचा समावेश होतो. सीरममध्येचे कोरोना प्रतिबंध लसीचं काम सुरू आहे. पण, या आगीत कोरोनाच्या लसीला कोणताही धक्का पोहोचलेला नाही. दरम्यान, दुपारी लागलेली आग विझवण्यात यश आल्यानंतर सायंकाळी त्याच इमारतीत पुन्हा आग भडकली होती. 

सीरम इन्स्टिट्यू्टमध्ये बीसीजी लस निर्मिती होत असलेल्या इमारतीला दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. त्या इमारतीत एक छोटी लॅब आहे. इमारतीत फारसे कोणी नसल्याने जीवितहानी झाली नसल्याचे बोलले जात होते. मात्र, सायंकाळ पर्यंत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

'हम तेजस्वी यादव बोल रहे हैं, DM साहब'; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल​

दरम्यान, आग्निशमन दलाच्या 15 गाड्यांनी आग आटोक्यात आणली. पण, त्याच इमारतीत सहाव्या मजल्यावर सायंकाळी पुन्हा आग लागली. अग्नीशमन दलाने पुन्हा ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, दुपारची आग विझवल्यानंतर पुन्हा आग कशी लागली? याविषयी माहिती मिळालेली नाही.

आगीच्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये तीन परप्रांतिय असून दोघे पुण्यातील असल्याचं समजते. रामा शंकर हरीजन, बिपिन सरोज (दोघेही रा. उत्तर प्रदेश), सुशील कुमार पांडे (बिहार), महेंद्र इंगळे व प्रतीक पाश्ते अशी आगीत मृत्यु झालेल्या कामगाराची नावे आहेत.

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीबाबत सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया​

कोरोनावरील कोविशील्ड या लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्युटमध्ये आहे. काही दिवसांपुर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही देशांच्या राजदुतांनी सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली होती. तर काही दिवसांपुर्वीच सीरम इन्स्टिट्युटमधून महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या भागात कोवीशील्ड ही लस पाठविण्यात आली. या सगळ्या घडामोडीमुळे सीरमकडे भारतासह संपुर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Serum institute fire Cyrus Poonawalla announced RS 25 lakh to each family