चाइल्ड पोर्नोग्राफीविरुद्ध दौंडमध्ये पहिला गुन्हा दाखल

Crime
Crime

दौंड : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या सूचनेनंतर बालकांच्या लैंगिक शोषणाचे दोन व्हिडिओ (चाइल्ड पोर्नोग्राफी) दौंड येथून समाज माध्यमांवर पसरविणाऱ्या एका अज्ञात इसमाविरूद्ध दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार श्रीरंग शिंदे यांनी शुक्रवारी (ता. २१) याबाबतची माहिती दिली. अनंत देइवा या टोपणनावाने एका अज्ञात व्यक्तीने ३० एप्रिल २०१९ रोजी समाज माध्यमांवर बालकांच्या लैंगिक शोषणाचे अश्लिल आणि बिभित्स असे दोन व्हिडिओ पसरविले (व्हायरल) होते.

सदर व्हिडिओ दौंड येथून प्रसारित झाल्याची तांत्रिक माहिती अमेरिकेतील 'नॅशनल सेंटर ऑफ मिसिंग अॅण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन' या संस्थेने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडे दिली. त्यानुसार गृह मंत्रालयाकडून सदर माहिती पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्राचे सायबर क्राईमचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडून पुणे ग्रामीण पोलिस दलाकडे आली होती.

यासंबंधी प्राप्त माहितीच्या आधारे शुक्रवारी दौंड पोलिस ठाण्यात श्रीरंग माणिक शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीविरूद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यातील (सुधारित) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ऋषीकेश धर्माधिकारी या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

नॅशनल सेंटर ऑफ मिसिंग अॅण्ड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रेन ही संस्था बालकांचे लैंगिक शोषण दर्शविणारे व्हिडिओ, छायाचित्र व अन्य तत्सम साहित्याच्या विरोधात कार्यरत आहे. भारतातून अशा ध्वनिचित्रफिती किंवा मजकूर प्रसारित करणाऱ्या व्यक्तींची तांत्रिक माहिती अमेरिकेतील या संस्थेकडून संकलित केली जाते आणि कारवाईसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडे पाठविली जाते. गृह मंत्रालयाकडून संबंधित राज्याच्या साइबर विभागाकडे ही माहिती पुढील कार्यवाहीसाठी पाठविली जाते.

बालकांच्या लैंगिक शोषण संदर्भातील व्हिडिओ समाज माध्यमांवरून पसरविणाऱ्या व्यक्तीच्या संगणकाचा  इंटरनेट प्रोटोकॅाल (आयपी) अ‍ॅड्रेस किंवा या कारणासाठी वापरलेल्या मोबाइल सिमकार्ड क्रमांकावरून गुन्हे दाखल केले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com