...अन् काही क्षणातच बिबट्या उसाच्या शेतात गेला !

...अन् काही क्षणातच बिबट्या उसाच्या शेतात गेला !

नारायणगाव : हिवरे तर्फे नारायणगाव, नारायणवाडी परिसरात मागील तीन महिन्यांपासून दोन बछड्यासह वास्तव्यास असणाऱ्या व पाळीव जनावरे, शेतकरी यांच्यावर हल्ला करणाऱ्या मादी बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात 
मादी ऐवजी बछडा अडकला. बछड्याच्या विरहामुळे आक्रमक झालेल्या मादीला शांत करण्यासाठी अखेर पिंजऱ्यात अडकलेल्या बछड्याला वनविभागाने आज सकाळी पुन्हा मादीच्या ताब्यात दिले. यामुळे आक्रमक झालेली मादी शांत झाली.

हिवरे तर्फे नारायणगाव, नारायणवाडी परिसरात मागील तीन महिन्यांपासून  दोन बछड्यासह मादी वास्तव्यास आहे. मादीला तिच्या बछड्यासह फिरताना शेतकऱ्यांनी पाहिले होते. १३ सप्टेंबर २०२० रोजी रात्री दुचाकीवरून निघालेले पशुवैद्यकीय डॉ. विशाल थोरात यांच्या पोटरीचा चावा बिबट्याने घेतला होता. सप्टेंबर महिन्यात नारायणवाडी परिसरातील अनेक पाळीव कुत्रे व जनावरांचा फडशा या मादीने पडला होता. २६ सप्टेंबर रोजी नारायणवाडी येथील नामदेव तोडकरी यांच्या वासराचा फडशा मादीने पाडला होता.

या वेळी मादी सोबत दोन बछडे होते. हल्ले वाढल्याने मादीला पकडण्यासाठी वनविभागाने नारायणवाडी येथे २७ सप्टेंबर रोजी पिंजरा लावला होता. मात्र मादी पिंजऱ्याकडे फिरकलीच नाही. त्या नंतर मादी बछड्यासह हिवरे तर्फे नारायणगाव परिसरात वास्तव्यास गेली होती. मादीला पकडण्यासाठी वनविभागाने हिवरे तर्फे नारायणगाव येथील कळंबजाई मळ्यात पिंजरा लावला होता.

आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेतकरी बाळू खोकराळे, संदीप वायाळ यांना शेतात लावलेल्या पिंजऱ्याच्या भोवती बिबट्या फिरताना दिसला. बिबट्या पिंजऱ्या पासून जात नसल्याने या बाबतची माहिती खोकराळे यांनी वनविभागाला दिली. उपवनसंरक्षक जयरामे गौडा, सहाय्यक वनसंरक्षक भिसे, वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मनिषा काळे, वनरक्षक रामेश्वर फुलवाड, स्वरूप रेंगडे, वनकर्मचारी  सुधीर भुजबळ, खंडू भुजबळ, विश्वास शिंदे यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या वेळी पिंजऱ्यात बिबट्याच्या ऐवजी त्याचा सुमारे आठ महिन्याचा बछडा अडकला असल्याचे वनविभागाला आढळून आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बछड्याच्या विरहामुळे मादी सैरभैर झाली होती. मादीचा एक बछडा पिंजऱ्यात व एक उसाच्या शेतात असल्याने बछड्याला मादीच्या ताब्यात न दिल्यास मादी आक्रमक होण्याचा धोका होता. या मुळे बछड्याला पुन्हा मादीच्या ताब्यात देण्याचा निर्णय पथकाने घेतला. सकाळी नऊ वाजण्याचा सुमारास वनपाल मनिषा काळे, वनरक्षक रामेश्वर फुलवाड यांनी मोठया शिताफीने पिंजऱ्याचा दरवाजा उघडून बछड्याला मुक्त केले. काही क्षणात बछडा उसाच्या शेतात गेला.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com