भाजपच्या दादाला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादीच्या या दादाची एन्ट्री

रमेश वत्रे
Monday, 10 August 2020

दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या दुसऱ्या पिढीने सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे.

केडगाव (पुणे) : दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या दुसऱ्या पिढीने सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. थोरात यांच्या खुटबाव या गावलगतच्या गलांडवाडी (ता. दौंड) येथील कृष्णाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार उर्फ गणेश (दादा) यांची बिनविरोध निवड झाली. ते सक्रिय राजकारणात असले, तरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील हे पहिलेच पद आहे. 

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ

दौंड तालुक्याच्या राजकारणामध्ये सन १९८५ पासून रमेश (आप्पा) थोरात आणि दिवंगत आमदार सुभाष (आण्णा) कुल यांच्या जोडगोळीने आपला जम बसवण्यास सुरुवात केली. सन १९९० नंतर अण्णा-आप्पा ही जोडी जिल्ह्यात खूपच फेमस झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार बाळासाहेब जगदाळे यांचे तालुक्यावरील वर्चस्व या जोडगोळीने सन १९९० मध्ये मोडीत काढले. त्यानंतर सुभाष कुल यांचे निधन होईपर्यंत कुल- थोरात यांनी एकत्रितपणे कामकाज पाहिले. या दोघांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद दिली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुभाष कुल यांनी विधानसभा कामकाज पहायचे आणि रमेश थोरात यांनी तालुक्यातील सहकार सांभाळायचा, असा अलिखित करार दोघांच्यात झालेला होता. या दोघांमुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत झाले. त्यामुळे भीमा पाटस कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक यावर कुल थोरात यांनी अबाधित वर्चस्व राखले. सुभाष कुल यांच्या निधनानंतर कुल कुटुंबीय व थोरात यांच्यातील दरी वाढत गेली. कुल यांचे वारसदार म्हणून रंजना कुल या राजकारणात पुढे आल्या. त्यानंतर त्यांचे सुपुत्र राहुल कुल यांनी राजकारणात प्रवेश केला. तुषार थोरात यांनी रमेश थोरात यांच्या सन २००९, सन २०१४ व सन २०१९ या तीन विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची धुरा सांभाळलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही त्यांच्यावर कोणतीही राजकीय जबाबदारी अद्याप दिलेली नाही. 

पुणेकरांच्या आठवड्याची सुरवात ट्रॅफिक जॅमने

सुभाष कुल व रमेश थोरात हे समवयस्क असले, तरी ६८ वर्षीय थोरात यांनी त्यांच्या मुलाकडे राजकारणाची सूत्रे अद्याप बहाल केलेली नाहीत. रमेश थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र गेल्या काही दिवसांपासून तुषार थोरात हे भावी आमदार, अशा पोस्ट सोशल मीडियावरून फिरविल्या आहेत. त्यामुळे सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कुल विरुद्ध थोरात, अशी पारंपरिक लढत होणार, की परंपरा खंडित होणार, हे पाहण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. 

बिबट्या दिसल्याने फटाके वाजवले तर...
 
आमदार राहुल कुल व रमेश थोरात यांच्यात विळ्या भोपळ्याचे राजकीय वैर आहे. मात्र, तुषार व राहुल यांच्यात सामंजस्य दिसून येत आहे.  एका लग्न समारंभात राहुल यांनी तुषार यांना फेटा बांधला होता, तर कुल यांना कोरोना संसर्ग झाल्यावर तुषार यांनी 'दादा लवकर बरे व्हा'  अशा शुभेच्छा सोशल मीडियावरून दिल्या होत्या. तुषार व राहुल हे भविष्यातील राजकीय स्पर्धक असणार आहेत. मात्र, त्यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष असू नये, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. या भावनेला तुषार व राहुल यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसू लागल्याने कार्यकर्ते समाधान व्यक्त करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA Ramesh Thorat's son Tushar enters active politics