गुणपत्रिकेवरील चिन्हांबाबत राज्य मंडळाचे स्पष्टीकरण

गुणपत्रिकेवरील चिन्हांबाबत राज्य मंडळाचे स्पष्टीकरण
Published on

गुणपत्रिकेवरील चिन्हांबाबत
राज्य मंडळाचे स्पष्टीकरण


‘£’ हे ब्रिटिश पौंड नसून ‘सर्वोत्तम पाच’ निकषाचे चिन्ह

सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ९ : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) मार्च २०२६ चा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रांवरील काही सांकेतिक चिन्हांबाबत सामाजिक माध्यमे व काही माध्यमांत गैरसमज पसरल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत स्पष्टीकरण प्रसिद्ध केले आहे. विशेषतः टक्केवारीसमोर दिसणारे ‘£’ हे चिन्ह ‘ब्रिटिश पौंड’ दर्शवित असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, मंडळाने हे स्पष्टीकरण फेटाळून लावत संबंधित चिन्हाचा शैक्षणिक संदर्भ स्पष्ट केला आहे.
राज्य मंडळाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रांमध्ये निकालासंदर्भातील विविध बाबी स्पष्ट करण्यासाठी अनेक वर्षांपासून सांकेतिक खुणांचा वापर केला जात आहे. या खुणांचे स्पष्टीकरण प्रत्येक गुणपत्रिका व प्रमाणपत्राच्या मागील बाजूस छापण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे मंडळाने म्हटले आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ‘XX’ ही खूण विषयातील सूट दर्शविते, तर ‘AA’ ही खूण अनुपस्थिती दर्शविते. ‘NN’ ही खूण लागू न पडणारा विषय दर्शविते आणि ‘CC’ ही खूण विषयाची संपादणूक रद्द केल्याचे दर्शविते. तसेच ‘*’ ही खूण प्रथम श्रेणीसाठी आवश्यक अतिरिक्त गुण दिल्याचे सूचित करते. ‘£’ या चिन्हाबाबत मंडळाने स्पष्ट केले, की ‘सर्वोत्तम पाच’ या निकषानुसार अनिवार्य सहा विषयांपैकी ज्या पाच विषयांमध्ये विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळाले आहेत, त्या पाच विषयांच्या आधारे ५०० पैकी एकूण गुण व टक्केवारी दर्शविण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते. याशिवाय क्रीडा, एनसीसी, स्काऊट-गाईड, कला क्षेत्रातील प्रावीण्य किंवा सहभागासाठी दिलेल्या अतिरिक्त गुणांसाठीही स्वतंत्र चिन्हांचा वापर करण्यात येतो. विद्यार्थी, पालक व शाळांनी गुणपत्रिकेवरील या सांकेतिक खुणांचा अर्थ समजून घेऊन अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com