आंबेगाव तालुक्यात रंगतायेत मटन-बिर्याणीचे बेत

डी. के. वळसे पाटील
Thursday, 14 January 2021

निवडणुकीत विजयी होण्यासाठी अनेक उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी मतदारांना खुश करण्याचे काम सुरु केले आहे.

मंचर : आंबेगाव तालुक्यात मंचर, पिंपळगाव, अवसरी खुर्द, गावडेवाडी, शेवाळवाडी, पेठ, शिंगवे, भागडी,महाळुंगे पडवळ येथे ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान शुक्रवारी (ता.१५) आहे. सुरु असलेला प्रचार थांबला आहे. निवडणुकीत विजयी होण्यासाठी अनेक उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी मतदारांना खुश करण्याचे काम सुरु केले आहे. मटन बिर्याणीचे बेत केले जात आहेत. काही मतदार तर शक्कल लढवून दोन्ही गटांच्या भोजनाचा आस्वाद घेत आहेत. शाकाहारींसाठी मासवडी व श्रीखंड पुरीच्या जेवणावळी दिल्या जात आहे. तर काही महिला उमेदवारांनी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करून भेटवस्तू देण्याचा कार्यक्रम केला आहे.

वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल?

मंचर येथे १७ जागांसाठी महाविकास आघाडीचे नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आठ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, माजी खासदार (स्व) किसनराव बाणखेले गटाचे कॉंग्रेसचे उमेदवार प्रथमच महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकत्र आले आहेत. अपक्ष भारतीय जनता पक्ष व काँग्रेसचे उमेदवार काही ठिकाणी महा आघाडीच्या उमेदवारांना आवाहन देत आहेत. 

आर्थिक क्षेत्रात करिअर करायचंय? चिंता करण्याचे कारण नाही 

पिंपळगाव तर्फे महाळुंगे (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या तेरा जागांपैकी तीन जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. उर्वरित दहा जागासाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अवसरी खुर्द येथे १७ जागांपैकी सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. ११ जागांसाठी २४ उमेदवार उभे आहेत.

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर चिकन बिर्याणीएवजी अनेकांनी मटन बिर्याणीला पसंती दिली आहे. मटन बिर्याणी तयार करणाऱ्या आचाऱ्यांना मागणी वाढलेली आहे. मंचर, अवसरी खुर्द, कळंब येथून अनेकांनी मटण खरेदी करून आपापल्या कार्यक्षेत्रात आचाऱ्यांना बोलावून खमंगदार बिर्याणीचा बेत तयार केला आहे. तर काहींनी ७५० रुपये किलोने मटन बिर्याणी खरेदी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही मतदारांनी व त्यांच्या मित्रमंडळींनी शक्कल लढवून बुधवारी (ता. १३) दुपारी एका उमेदवाराकडून व रात्री त्याच्याविरुद्ध उभ्या राहिलेल्या उमेदवाराकडून पार्टीचा आस्वाद घेतल्याची चर्चा आहे. मतदारांना ने-आण करण्यासाठी व मतदान झाल्यानंतर नाष्ट्याची व्यवस्था करण्याचेही नियोजन उमेदवारांच्या  कार्यालयात गुपचूपपणे  सुरू आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grampanchayat election update in ambegaon taluka