पुणे : नातवाने आजोबांना घातला 16 कोटी 43 लाखांना गंडा!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 October 2019

पगारे हे शेअर्सचे चांगले जाणकार आहेत. त्यांनी 40 वर्षात वेगवेगळ्या कंपन्याचे अनेक शेअर्स विकत घेतले, त्यापैकी एकही शेअर्स विकला नाही.

पुणे : शेअर्स आणि दैनंदिन कामात मदत करतो असे सांगून नातवाने आपल्या आयकर विभागाच्या निवृत्त अधिकारी असलेल्या आजोबांचे शेअर्स स्वत:च्या नावे करुन, शेअर्सची परस्पर विक्री करुन वृद्ध आजोबांची तब्बल 16 कोटी 43 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी नातवाला अटक केली असून त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्यात येणार आहे.

जितेंद्र अरविंद पगारे (वय 27, रा. कल्याणीनगर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी लीला रवींद्र पगारे (वय 74, रा. अलंकार चित्रपटगृहाजवळ, आगरकरनगर, पुणे स्टेशन) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

बंडगार्डन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती रविंद्र पगारे हे आयकर विभागातून अतिरिक्त आयुक्त या पदावरुन निवृत्त झाले आहेत. त्यांना दोन मुले असून तीन नातू आहेत. त्यापैकी मोठा मुलगा जितेंद्र आणि स्वत: रविंद्र पगारे हे सध्या पुण्यात राहतात. पगारे हे शेअर्सचे चांगले जाणकार आहेत. त्यांनी 40 वर्षात वेगवेगळ्या कंपन्याचे अनेक शेअर्स विकत घेतले, त्यापैकी एकही शेअर्स विकला नाही. त्यांच्याकडील शेअर्सची सध्याच्या शेअर बाजारमूल्यानुसारची किंमत 16 कोटी 43 लाख 29 हजार रुपये इतकी होती.

दरम्यान, त्यांनी शेअर्सविषयीचे आपल्याकडील ज्ञान नातू जितेंद्रला दिले. त्यानंतर जितेंद्र हा पगारे यांना शेअर्स आणि दैनंदिन कामात मदत करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने पगारे यांचे काही शेअर्स स्वत:च्या नावावर करुन घेतले. पगारे, त्यांच्या पत्नी शेअर्सचे कायदेशीर हकदार असताना नातवाने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी परस्पर शेअर्स स्वत:च्या नावे केले. तेवढ्यावर न थांबता त्याने पगारे यांची तब्बल 16 कोटी 43 लाख 29 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 15 मार्च ते 4 एप्रिल 2019 या कालावधीत घडला.

दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली. तसेच पोलिसांनी त्याच्या बँक खात्यातील तीन कोटी रूपये गोठविले आहेत.

अशी केली कोटयावधी रूपयांची उधळपट्टी!

आजोबांचे शेअर्स स्वत:च्या नावावर करुन नातवाने त्याची परस्पर विक्री केली. त्यातून आलेल्या 10 कोटी रकमेचा स्वत:साठी वापर केला. त्यामध्ये त्याने 7 कोटी रुपये म्युच्युअल फंडात गुंतविले. 15 लाख रुपयांची कार, सव्वा कोटी रूपयांचा आलिशान फ्लॅट आणि 25 लाख रूपयांचे दागिने खरेदी केले. तसेच मित्रांसमवेत रशियामध्ये बिझनेस सुरु करण्यासाठी त्यास 25 लाख रूपये दिले आहेत.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- 'आरे'वर रोहित शर्माची बॅटिंग; हिटमॅन हिट-विकेट

- ब्राम्हण महासंघात उभी फूट; नव्या संघटनेची घोषणा

- Pune Rain : पुण्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grandson cheated his grandfather for shares in Pune