हिंजवडी, तळवडे आयटी पार्कमधील कंपन्यांकडून महिलांच्या सुरक्षेकडे होतेय दुर्लक्ष

Women-Security
Women-Security

तळवडे, हिंजवडी आयटी पार्कमधील छोट्या कंपन्यांकडून होतेय दुर्लक्ष
पिंपरी - आयटी सेक्‍टरमध्ये रात्रपाळीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ‘पिकअप-ड्रॉप’ करण्यासाठी त्यांच्यासोबत कंपनीचे सुरक्षारक्षक असणे आवश्‍यक असते. मात्र, केवळ नामांकित कंपन्यांकडूनच ‘पिकअप-ड्रॉप’च्या वेळी महिला कर्मचाऱ्यांसमवेत सुरक्षारक्षक पाठविले जात असून, छोट्या कंपन्यांकडून मात्र, सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे. हैदराबाद येथील घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

तळवडे व हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये शेकडो आयटी कंपन्या आहेत. त्यात अन्य देशांतील कामकाज चालते. त्यामुळे या कंपन्यांमध्ये चोवीस तास काम सुरू असते. काही कंपन्यांत दोन तर काहींमध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रात्री-अपरात्री घरी जावे लागते किंवा कंपनीत यावे लागते. त्यासाठी पिकअप-ड्रॉपची सुविधा कंपन्या ठेवतात. यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असतो.

महिलांच्या सुरक्षेसाठी काही कंपन्यांनी मोटारीत सुरक्षारक्षक पाठविण्याचीही व्यवस्था केली आहे. कंपनीतून पिकअप केल्यानंतर घरापर्यंत सोडेपर्यंत किंवा घरातून पिकअप केल्यानंतर कंपनीत येईपर्यंत हा सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांसमवेत राहतो. ट्रॅकिंग सिस्टिमद्वारेही मोटारीचे ‘लोकेशन’ तपासले जाते. घरी पोचल्याबाबतची खातरजमा कंपन्या फोनवरूनही केली जाते. मात्र, या सुविधा केवळ मोठ्या कंपन्यांकडूनच पुरविल्या जातात. छोट्या कंपन्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. बहुतांश कंपन्यांकडून महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक दिले जात नाहीत. 

महिलांनीही काळजी घेणे गरजेचे
कंपनीतून सुटल्यानंतर घरी जाईपर्यंत अनेकदा महिला कर्मचारी मोटारचालकाला रस्त्यात मध्येच ड्रॉप करण्यास सांगतात. अशावेळी त्या कर्मचाऱ्याची सुरक्षा धोक्‍यात येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशावेळी महिलांनी सुरक्षेची काळजी स्वतः घेऊन मध्येच ड्रॉप मागू नये.

महिलांबाबत एखादी दुर्घटना घडल्यानंतरच पोलिसांसह संबंधित कंपन्यांच्या यंत्रणांना जाग येते. त्यानंतर सुरक्षेचा आढावा घेतला जातो. मात्र, अशा घटना घडूच नयेत, यासाठी अगोदरपासूनच काळजी घ्यायला हवी. ज्या कंपन्यांकडून सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यासह पोलिसांनीही उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना देणार पत्र 
आयटी कंपन्यांतील महिलांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत की नाही, याचा आढावा घेण्यात यावा, अशा मागणीचे पत्र जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना देण्यात येणार असल्याचे ‘फाइट’चे अध्यक्ष पवनजित माने यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com