राजू शेट्टींनी पवारांच्या कारखान्यांचा पट्टा असा पाडला होता बंद.. 

raju shetty
raju shetty
Updated on

सोमेश्वरनगर (पुणे) : शरद पवार हे सत्तेत असताना राजू शेट्टी त्यांच्यावर अक्षरशः आग ओकत होते. पवार यांनीही शेट्टी यांना अधूनमधून चुचकारले. परंतु, भाजपशी संग कुसंग ठरल्याच्या अनुभवातून दोघेही मागील वर्षी निवडणुकांत एकत्र आले. आता तर पवार यांनी शेट्टी यांना चक्क राष्ट्रवादी कांग्रेसच्या कोट्यातून आमदारपदाची संधी देऊन अनोखा संदेश राज्याला दिला आहे. ज्या शेतकरीहिताच्या मुद्द्यांवरून शेट्टी- पवार संघर्ष उभा ठाकला होता. त्याच शेतकरी हितावरून त्यांनी संघर्ष संपविला आहे. या मनोमिलनाने शेतकऱ्यांच्या मात्र अपेक्षा उंचावल्या आहेत. 

शरद पवार हे केंद्रात सलग दहा वर्ष केंद्रीय कृषिमंत्री होते, तर अजित पवार हेही राज्यात अर्थ, जलसंपदा, उर्जा अशी मंत्रीपदे सांभाळत होते. त्यामुळे शेतकरी संघटनांनी 'बारामती' टार्गेट केली होती. विशेषतः राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचे केंद्र कोल्हापूर, सांगलीकडून पुणे जिल्ह्याकडे सरकले होते. सतीश काकडे, रंजन तावरे, पृथ्वीराज जाचक या साखरपट्ट्यातील शेतकरी कृती समितीच्या नेत्यांना ताकद देत, त्यांची मदत घेत स्वाभिमानीने साखर उद्योगांना जेरीस आणले होते. पवार यांच्या अधिपत्याखालील माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती या तिन्ही कारखान्यांचा पट्टा बंद करण्याची धमक स्वाभिमानीने दाखवून दिली होती. हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्यावर येऊन वाहनांची तोडफोड केली होती. सतीश काकडे यांचे आंदोलन तर राज्यभरात पोचले होते. 

शेट्टी हे बारामतीत येऊन पवार यांच्यावर आणि आघाडी सरकारवर जहाल टिका करत होते. एकदा तर हजारो शेतकऱ्यांसह पंढरपूरहून पायी चालत बारामतीपर्यंत आले. बारामतीत येऊन अचानक उपोषण जाहीर केले. सगळ्या राज्याचे केंद्र बारामती बनले होते. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंदबागेसमोर येऊन धरणे आंदोलन केले, साखर आयुक्तालय फोडले. या कारनाम्यांवरून अजित पवार हे शेट्टी यांना थेट अंगावर घेत, परंतु शरद पवार यांनी बऱ्याचदा अनुल्लेखानेच कार्यभाग साधला. शिवाय जेव्हा जेव्हा शेट्टी यांच्याविरोधात बोलले तेव्हा तेव्हा मात्र प्रखर उपरोधिक टिका केली. 

दरम्यान, सन २०१४-१५ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शेट्टी यांनी भाजपाशी हातमिळवणी करत सत्तेचा सोपान गाठला. परंतु, शेट्टींच्या अपेक्षा आणि भाजपची निती यात जमीन- आस्मानाचे अंतर पडले. थेट मोदी- फडणवीस यांच्या शेतकरी धोरणावर जहरी टिका करत शेट्टी यांनी भाजपशी फारकत घेतली. हिच फारकत काँग्रेस- राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली. भाजपला जिंकण्याची दोनशे टक्के अहंकारी खात्री होती, तर काँग्रेस- राष्ट्रवादी मात्र अस्तित्वासाठी झगडत असलेले. त्यामुळे शेट्टी यांचा स्वाभिमानी, डावे पक्ष आदी घटक पक्षांसोबत मोट बांधण्यात पवार यांनीच पुढाकार घेतला. 

निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाल्यानंतर शिवसेनेला घेऊन सिंहासन काबीज करण्यातही पवार यांच्याच चाली उपयुक्त ठरल्या. राज्यातच नव्हे तर देशात पवार नावाचा दबदबा पुन्हा तयार झाला. आता राज्यात शब्दाला किंमत आल्याने पवार यांनी घटक पक्षांकडे लक्ष द्यायला सुरवात केली आहे. शेट्टी यांचा संघर्ष आपल्याविरोधात असला, तरी तो शेतकऱ्यांसाठी होता, हे पवार यांच्यासारख्या जाणत्या नेत्याने ओळखले. त्यामुळे शेट्टी यांचा हल्लाबोल विसरून जाणीवपूर्वक स्वाभिमानीला उर्जितावस्था देण्यासाठी आमदारकीची ऑफर दिली आहे. त्यांना गोविंदबागेत निमंत्रित केले. 

पवार यांनी शेट्टी यांसह शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांना अडीच तास स्वतःची प्रयोगशील शेती दाखविली. सोबत भोजन केले आणि आमदारकीही गळ्यात टाकली. यातून राष्ट्रवादी शेतकरी हित बघणारा, शेतकरी संघटनांना आपलेसे करणारा पक्ष आहे, हा संदेशही राज्यात जाणार आहे. राष्ट्रवादीचे राजकारण आता 'शेतकरीकेंद्रीत' झाल्याचीच ही नांदी आहे. पवार- शेट्टी यांच्या या युतीकडे महाराष्ट्रातील शेतकरी फार आशेने पाहत आहे. हेच प्रेम फुलत गेले तर कदाचित शेट्टी मंत्री झाल्याचेही राज्य पाहू शकतो, अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे. 

सतीश काकडे म्हणाले, शेट्टीसाहेबांनी पवारांच्या विरोधात संघर्ष केला असला, तरी ते वैयक्तीक नव्हे तर शेतकऱ्याच्याच मुद्द्यावरून भांडत होते. पवारसाहेबांनाही निश्चितच शेतकऱ्यांच्या कळवळा आहे. तेच शेतकऱ्यांचे सर्वोच्च नेते आहेत. नेमक्या याच शेतकरी हिताच्या समान मुद्द्यावरून निवडणुकीतही आणि आताही मनोमिलन झाले आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com