'थर्टी फर्स्ट'च्या रात्री दस्तुरखुद्द गृहमंत्री पोलिस नियंत्रण कक्षात; पोलिसांसोबत केलं नववर्षाचं स्वागत!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

कोरोना काळातील कामाने तुम्ही नक्की थकला आहात, पण तुम्ही हिमतीने काम केले. यापुढे याच हिमतीने एकत्र लढत राहू आणि कोरोनामुक्त महाराष्ट्र करू.

पुणे : सगळ्यांना वेध लागतात ते थर्टी फर्स्ट मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचे, पण पोलिस मात्र "थर्टी फर्स्ट'ची रात्र शांततेत पार पडावी, यासाठी सायंकाळपासूनच रस्त्यावर कडेकोड बंदोबस्त देत उभे असतात. नागरीकांचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या याच पोलिसांना खंबीर मानसिक आधार देण्यासाठी गुरूवारी (ता.३१) दस्तुरखुद्द गृहमंत्र्यांनीच पोलिस नियंत्रण कक्षात हजेरी लावली. रस्त्यावर बंदोबस्त करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी "कोरोना काळातील कामाने तुम्ही नक्की थकला आहात, पण तुम्ही हिमतीने काम केले. यापुढे याच हिमतीने एकत्र लढत राहू आणि कोरोनामुक्त महाराष्ट्र करु," अशा शब्दात पोलिसांना भक्कम विश्वास दिला!

Welcome 2021: दरवर्षी गर्दीने गजबजून जाणारे पुण्यातील रस्ते पडले ओस!​

सर्वसामान्य नागरीकांबरोबरच पोलिस कर्मचारी असो किंवा वरिष्ठ पोलिस अधिकारी. सगळ्यांमध्ये तितक्‍याच आत्मियतेने मिसळून त्यांच्याशी हितगुज साधत त्यांना मानसिक आधार देण्याची किमया गृहमंत्री अनिल देशमुख हे कायम साधतात. एखाद्या शहराचा दौरा करताना रस्त्यात बंदोबस्त करणाऱ्या पोलिसाचा वाढदिवस साजरा करणे असो किंवा कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवरील नाकेबंदीच्यावेळी पोलिसांमध्ये मिसळून त्यांच्यासमवेत चहा घेणे असो. कोरोनामुळे निधन झालेल्या पोलिस बांधवांच्या कुटुंबीयांशी भावनिक नाते निर्माण करण्यासाठीचे पत्र पाठविणे असो. अशा वेगवेगळ्या उदाहरणांमधून देशमुख यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची खासीयत पटवून दिलेली आहे.

Welcome 2021 : न्यूझीलंडमध्ये झालं नव्या वर्षाचं भन्नाट स्वागत; पाहा व्हिडिओ! 

राज्यातील पोलिसांसाठी चांगले, अभिनव उपक्रम राबवितानाच पोलिसांकडे माणुसकीच्या नात्याने पाहून त्यांच्यासाठी भरीव काम करण्याचे काम करणाऱ्या देशमुख यांनी 2020 ची थर्टी फर्स्टची रात्री स्वतःच्या कुटुंबीयांसमवेत, मित्र मंडळी किंवा नातेवाईकांसमवेत घालवली नाही, तर थेट पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात ठिक रात्री साडे अकरा वाजता उपस्थित राहून आपली आगळी वेगळी 'थर्टी फस्ट' साजरी केली. देशमुख यांनी नियंत्रण कक्षातील पोलिसांबरोबरच नियंत्रण कक्षामध्ये येणाऱ्या फोनवर नागरीकांशीही संवाद साधला. त्याचबरोबर नियंत्रण कक्षातूनच बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांची आपुलकीने चौकशी केली.

श्वान आणि रिक्षावाल्याची हृदयस्पर्शी गोष्ट; लेखिकेची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल!​  

"कोरोना काळातील कामाने तुम्ही नक्की थकला आहात, पण तुम्ही हिमतीने काम केले. यापुढे याच हिमतीने एकत्र लढत राहू आणि कोरोनामुक्त महाराष्ट्र करू," असा खंबीर विश्वास त्यांनी दिला. तसेच 'थर्टी फर्स्ट'च्या बंदोबस्ताचा ताण तुमच्यावर असणार, परंतु मी तुमच्यासमवेत आहे. चांगला बंदोबस्त करा. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वतःची काळजी घ्या, असे भावनिक आवाहनही त्यांनी पोलिसांना केले. 

यावेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह अपर पोलिस आयुक्त आणि अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HM Anil Deshmukh arrived at Pune police control room and celebrated New Year 2021