'चिंता वाटते' म्हणत पृथ्वीराज चव्हाणांचा ‘काँग्रेस’ला घरचा आहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj Chavan

'चिंता वाटते' म्हणत चव्हाणांचा ‘काँग्रेस’ला घरचा आहेर

पुणे : ‘‘आगामी काळात येणाऱ्या राजकीय परिस्थितीमध्ये सर्व समविचारी पक्षांना एकजूट येण्याची गरज असून त्यासाठी काँग्रेसने (Congress) पुढाकार घ्यायला हवा. देशात व्यापक समविचारी पक्षांची आघाडी होणे आणि पर्यायी विरोधी पक्ष उभा करण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. आता काँग्रेस पक्षाने लोकशाही बळकट करून नेतृत्व करायची भूमिका घेतली नाही, तर पुढील प्रवास खडतर असून त्याची चिंता वाटते,’’ असे परखड मत मांडत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ट नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavhan) यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला. (Prithviraj Chavan On Congress Party)

हेही वाचा: रामबन बोगदा अपघात : मृतांची संख्या पाचवर; अद्यापही काही बेपत्ता

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Pune University) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्रीपाल सबनीस लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणीत सामाजिक क्रांती’ या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी झाले. यावेळी चव्हाण बोलत होते. चव्हाण म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही टिकविण्यासाठी तयार केलेली चौकट म्हणजे संविधान आहे आणि ही लोकशाही टिकविण्याची दुसरी सामाजिक क्रांती आपल्याला करावी लागणार आहे. सध्या भारतीय राज्यघटनेला सुरुंग लावण्याचे काम सुरू असून हा धोका निर्माण झाला आहे. राजकीय पक्ष हे संसदीय लोकशाहीचा आधार आहेत. राजकीय पक्ष संघटना दुर्बल होणे, ही चिंतेची बाब आहे.’’

हेही वाचा: स्पॅम कॉल्सपासून होणार सुटका! जाणून घ्या सरकारचा नवीन प्लॅन

शिंदे म्हणाले, ‘‘संपूर्ण देशात चातुवर्ण्य व्यवस्था येतोय की काय, अशी भीती वाटत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक समतेवर आधारित चळवळ उभी करावी लागणार आहे. बाबासाहेबांनी विचारांची लढाई लढविली आणि त्यातून समाज क्रांती झाली. आता तरुण पिढीला आत्मचिंतन करण्याची गरज असून विचारांचे शस्त्र घेऊन उभे राहिले पाहिजे.’’ कार्यक्रमात डॉ. करमळकर, डॉ. तांबे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. खरे यांनी तर, सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.

हेही वाचा: पृथ्वीराज चौहान राजपूत की गुर्जर राजा? अक्षयचा 'पृथ्वीराज' सापडला वादात

‘‘राजकीय पक्ष हे ध्येयापासून दूर जात असतील, तर लेखक, वाचक, नागरिकांनी काय करावे. महापुरूषांना घातलेली जातीची, धर्माची जानवे आता जाळावी लागतील. महापुरुष हे डावे-उजवे, जाती-धर्माचे नसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नाहीत, तर ते मानवतावादी विचारांचे आहेत.’’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: I Am Worried About Congres Party Says Prithviraj Chavan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top