मुंबईहून आलेल्या दोघा मायलेकींना कोरोनाची लागण; इंदापूरकर धास्तावले!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

नगर परिषद व पोलीस प्रशासनाने शहर कोरोनामुक्त ठेवले होते. मात्र मुंबई-पुण्यातून लोक इंदापूरला येऊ लागल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे.

इंदापूर : मुंबईहून गावी आलेल्या मायलेकींना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी (ता.१६) स्पष्ट झाले. शिरसोडी (ता. इंदापूर) मधील एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या असल्याने परिसरात घबराट उडाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्या दोघींचे इंदापूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय वसतिगृहात विलगीकरण करण्यात आले आहे. मात्र इंदापूर शहरात अद्याप एकही रुग्ण आढळला नसल्याने या घटनेमुळे इंदापूरकर धास्तावले आहेत.

आणखी वाचा - बारामतीकरांचे सोने खरेदीचे आकडे वाचून थक्क व्हाल

मुंबई येथील कोरोना बाधित भागातून एक चार जणांचे कुटुंब गुरुवारी (ता.१४) शिरसोडी या गावी आले. त्याची माहिती प्रशासनास मिळताच तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या आदेशाने गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ हे आपल्या कर्मचाऱ्यांसमवेत शिरसोडी येथे गेले.

पुण्यावर नामुष्की : ऍम्ब्युलन्स न आल्यानं रस्त्यावर एकाचा मृत्यू 

सदर कुटुंबीयांचे शाळेत विलगीकरण करण्यात आले असून ते ज्या घरात राहिले होते, त्यावर तीन वेळा सोडीयम हायपो क्लोराईड द्रावणाची फवारणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घशातील द्रावाचे नमुने घेतले. त्याचा रिपोर्ट शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाला असून चार पैकी दोघांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह, तर इतर दोघांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. मात्र त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

- 'फुकट काम करा, नाहीतर राजीनामा द्या'; पुण्यातील आयटी कंपनीचा प्रताप!

नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर तसेच नगर परिषद व पोलीस प्रशासनाने शहर कोरोनामुक्त ठेवले होते. मात्र मुंबई-पुण्यातून लोक इंदापूरला येऊ लागल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे शहर कोरोनामुक्त ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करावी अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. सदर रुग्ण हे मुंबईतून ज्या गाडीने आले, त्या गाडीच्या चालकाची तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तातडीने कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी विजय कुमार परीट यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. तसेच शिरसोडी येथे कोरोनाग्रस्त आढळलेल्या दोन रुग्णांची प्रशासन काळजी घेईल, त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Indapur 2 corona patients found on Saturday who came from Mumbai