धक्कादायक : दारूच्या दुकानाबाहेर होणार होती शिक्षकांची नेमणूक; आता...

wine.jpg
wine.jpg

पुणे : ज्ञान मंदिरात ज्ञानदानाची सेवा रूजु करणाऱ्या शिक्षकांची दारूच्या दुकानांसमोरील देखरेखीसाठी केलेली नेमणूक त्वरीत रद्द करण्याची सूचना शिक्षण विभागाने केली आहे. त्यासंदर्भात संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

लॉकडाउनमध्ये स्वस्त धान्य देणाऱ्या दुकानांमधून होणाऱ्या लुटमारीवर नियंत्रणासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्त करण्यात आली होती. तर सर्वेक्षण अधिकारी म्हणून काही प्राध्यापकांची नेमणूक केली होती. त्यानंतर आता दारूच्या दुकांनासमोर गैरप्रकार होऊ नयेत, तसेच सर्व अटी व नियमांचे पालन होते का, सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते का, याची देखरेख करण्यासाठी चक्क शिक्षकांची नेमणूक करण्याचा प्रकार काही ठिकाणी नुकताच घडला होता.

दरम्यान, शिक्षक, प्राध्यापकांना अशा स्वरूपाचे काम दिल्यामुळे सर्व स्तरांतून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात येत होती. विविध संघटना, शिक्षक, प्राध्यापक संघटनांनी या विरोधात आवाज उठविला. त्यानंतर शिक्षकांची ही नेमणूक रद्द करण्यात आली.

याबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी म्हणाले, "दारूच्या दुकांनासमोर गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षकांची नेमणूक करण्याचा प्रकार त्वरीत बंद करावा आणि संबंधित नेमणूक रद्द करावी, अशा सुचना संबंधित तहसिलदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिक्षण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.''

"दारूच्या दुकानांसमोर ग्राहकांना सामाजिक अंतर ठेवण्यासाठी शिस्त लावणे, दारू घेणाऱ्यांना नियंत्रित करणे ही कामे शिक्षकांना सोपविणे हे अत्यंत घृणास्पद आहे. शिक्षकांना या प्रकारचे काम दिल्याचा निषेध असून, अशा प्रकारचे काम राज्यातील कुठलाही शिक्षक करणार नाही, अशा भूमिकेचे निवेदन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com