esakal | पुण्यातल्या गणेशोत्सवावर असं सावट पहिल्यांदाच आलं; वाचा इतिहास!
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh-Festival-Pune

पानशेत धरणफुटीच्या 1961 च्या घटनेनंतर उभारलेल्या तात्पुरत्या घरांत पुणेकरांनी गणपती बसवले होते. पुण्यात 1965 मध्ये हल्याची  दंगल आणि पाकिस्तानचा हल्ला असं संकट उत्सवावर आलं आणि मिरवणूक चार तासांत आवरा, असा आदेश निघाला.

पुण्यातल्या गणेशोत्सवावर असं सावट पहिल्यांदाच आलं; वाचा इतिहास!

sakal_logo
By
सुनील माळी

ईदची नमाज मोठ्या संख्येने मैदानात न करता घरीच अदा करावी, या स्तुत्य निर्णयापाठोपाठ आता गणेशोत्सवात पुण्याच्या रस्त्यांवर होणारी लाखोंची गर्दी टाळण्याचे आव्हान पुणेकरांपुढे उभे आहे. याचं कारण असय की गणेशोत्सवावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जिवावरचं सावट पहिल्यांदाच आल्याचं इतिहास सांगतो. साध्या पद्धतीने उत्सव करण्याचा निर्णय मानाच्या मंडळांनी घेऊन पहिले पाऊल टाकले आहे. देखाव्याचा व्हिडिओ आधुनिक झूम, गुगल हँडआऊट किंवा सिस्कोसारख्या तंत्राच्या मदतीने रोज दाखवल्यास उत्सवाचा हेतू सफल होईल आणि कोरोनाचा संसर्गही टाळला जाईल. उत्सवातील जाणत्या कार्यकर्त्यांनो, पटतयं का?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या उत्सवाची पंढरी मानल्या गेलेल्या पूर्व भागात शेकडो बाधित सापडत असताना आणि त्यात जीव गमवावा लागलेल्यांचा आकडा  230 च्या पार पोचवून कोरोना तांडव करत असताना उत्सव कसा साजरा करायचा, हा प्रश्न हजारो
कार्यकर्त्यांच्या मनात आहे. त्यावर उत्सवातील एक कार्यकर्ता या नात्यानं काही विचार तुमच्यापुढं मांडतो आहे...

... पण त्यापूर्वी मानाच्या मंडळांनी झूमद्वारे घेतलेल्या बैठकीबाबत काही सांगायची वेळ आली आहे. मानाच्या मंडळांनी पुण्याच्या सर्व मंडळांचे नेतृत्व करणं अपेक्षित आहे आणि त्यांनी या मंडळांशी चर्चा न करताच स्वतंत्र बैठक घेऊन निर्णयच जाहीर करून टाकणं, या कृतीनं पुण्यातील इतर मंडळांमध्ये अलगतेची भावना निर्माण होऊ शकते. याआधीही मिरवणुकीसारख्या अनेक विषयांवर स्वतंत्र  बैठक आणि निर्णय असा त्यांच्याबाबतचा अनुभव असल्याने त्यांनी झूममध्ये किमान शंभर प्रातिनिधीक मंडळांना सहभागी करून घेतलं असतं, तर त्यांच्या नेतृत्वाला उणेपणा नव्हे तर थोरपणाच आला असता. असो. उत्सव कसा साजरा करायचा, याबाबतची चर्चा हा या लिखाणाचा विषय वेगळा असल्याने सर्व मंडळांच्या सामिलकीबाबत पुन्हा कधीतरी चर्चा करणं  योग्य ठरेल...

- 'परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावर चर्चा करा'; कुलगुरूंकडे कुणी केली ही मागणी!

उत्सवात गर्दी झाल्यास समाजाचं स्वास्थ्य धोक्यात येऊ शकतं, अशी वेळ 2008 च्या स्वाईन फ्लूमध्येही आली होती, पण याची आठवण कार्यकर्त्यांना निश्चित आली असेल. त्या साथीमध्येही पुण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी साधेपणानं उत्सव केला होता, पण तरीही कोरोनासारखी लागणीची अन मृत्यूच्या सावटाची भीती त्यावेळी नव्हती. त्यामुळं उत्सवातील
गर्दी थोडी उणावली तरी उत्सव झाला होता अन काहींनी मास्क घालून तर बऱ्याचशा पुणेकरांनी मास्क न घालताच उत्सवात-मिरवणुकीत  भाग घेतला होता. त्यावेळच्या स्थितीची तुलना कोरोनाच्या आताच्या साथीशी करता येणार नाही.

कोरोनाचं हे संकट खूपच गहिरं आहे आणि उत्सवाच्या 128 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा जिवावर उठलेल्या संकटाला आपल्याला तोंड द्यावं लागतंय. अर्थात, त्याचं गांभीर्य कार्यकर्त्यांना असल्यानेच ते हातावर पोट असलेल्यांना जेवण-शिधा देण्याच्या कामात हिरीरीनं सहभागी झालेत आणि उत्सवातही ते कोरोनाला रोखण्याचं आपलं कर्तव्य चोखपणानं निश्चितच बजावतील, असा विश्वास आहे.  स्वाईन फ्लूच्या वेळी नसलेलं तंत्रज्ञान आता बदलत्या काळानुसार आपल्याला उपलब्ध झालंय. त्याचा लाभ घेऊन उत्सव अधिक नेटकेपणानं करता येईलच, पण त्याचबरोबर लोकसहभाग हा उत्सवाचा आत्माही साधता येईल. दोन महत्त्वाच्या गोष्टींनी हा उत्सव रंगतो आणि सजतो. धार्मिकतेनं आणि रंजकतेनं. आपापल्या श्रद्धेच्या ठिकाणाचं दर्शन घेणं, हात जोडून प्रार्थना करणं हा जसा महत्त्वाचा भाग असतो तसाच मंडळांच्या देखाव्यांचा आनंद लुटण्याचाही असतो.

या दोन्ही गोष्टी आपल्याला नव्या तंत्रानं करता येणं सहज शक्य आहे. कोरोनामुळे अनेक कार्यालयातील कर्मचारी वर्क फॉर्म होम म्हणजेच घरून काम करू लागले. कार्यालयातील बैठका बंद पडल्या तसेच विविध विषयांवरील परिसंवाद-मेळावे-चर्चासत्रे-व्याख्याने-कार्यशाळांवरही गदा आली. नव्या तंत्रज्ञानानं तिथंही मदत केली. झूमसारख्या अॅपने शंभर जण एकाच वेळी एकत्र येऊ लागले, एकमेकांना पाहू लागले, बोलू लागले.

- पुणेकरांना जबर धक्का : दिवसभरातील रुग्णसंख्या पोहोचली तीनशेपर्यंत!

परिसंवाद-मेळावे-कार्यशाळा आदी निर्विघ्नपणे सुरू झाल्या. माझा वेबिमार आहे आज यांसारखी वाक्यं कायम ऐकू येऊ लागली. काही अॅपवर तर दोनदोन हजार जण एकाच वेळी एका व्यासपीठावर येऊ शकतात, त्यांच्या भाषेत जॉईन होऊ
शकतात. या तंत्राचा उपयोग आपल्याला आपले देखावे सादर करताना होऊ शकतो. पुण्याच्या गणेशोत्सवातील गेल्या काही वर्षांच्या देखाव्यांकडे नजर टाकली तर बहुतांश ठिकाणी कलाकारांनी सादर केलेले म्हणजे ज्यांना जिवंत देखावे
असं म्हटलं जाते, ते सादर केल्याचे लक्षात येईल. या देखाव्यांचे चित्रीकरण करून ते झूमसारख्या साधनांनी रोज दाखवणं  सहजशक्य आहे. त्यासाठी पुणेकरांना देखाव्याच्या मांडवापर्यंत यायची गरज उरणार नाही. प्रत्येक मंडळाने झूम किंवा तत्सम अॅपवरची मिटींग रोज ठरावीक वेळांना बुक करून टाकायची आणि प्रत्येक मिटिंगचा पासवर्ड जाहीर करून टाकायचा. दर
अर्ध्या तासासाठी वेगळी मिटिंग आणि वेगळा पासवर्ड असेल. त्यात येणाऱ्या पहिल्या शंभर जणांना देखावा पाहता येईल. आणखीही काही अधिक जण सामावून घेतले जाणारे अॅप आपल्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहेत.

उत्सवात पुण्यात फिरताना एक लक्षात येतं की आयटीमधील अनेक तंत्रज्ञ, अभियंते मंडळांचे कार्यकर्ते म्हणून महिनामहिना राबतात. ते याहीपुढचे उपाय सुचवू शकतील. हे झालं देखाव्यांबाबत आणि मंगलमूर्तींचं दर्शन फेसबुक लाईव्ह द्वारे आपल्याला भाविकांना घडवता येऊ शकतं. अनेक मंडळांनी आपल्या मूर्ती वर्षभर ठेवण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था केली आहे. त्याच ठिकाणी  मूर्तीची पूजा मांडली जाऊ शकते, वेगळा उत्सवाचा मांडव टाकण्याचीही गरज नाही. काही जणांकडे मूर्तींसाठी अशी व्यवस्था नसेल तिथे मांडव टाकावा लागेल.  मात्र मांडव टाकला किंवा न टाकला तरी दर्शनासाठी येणाऱ्यांची गर्दी होणार नाही आणि शारीरिक अंतर ठेवूनच भाविक दर्शन घेतील, अशी खास व्यवस्था करावी लागेल. विेशेषतः श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, बाबु गेनू अशा मंडळांच्या श्रींच्या दर्शनासाठी म्हणून भाविक गर्दी करतात. त्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने आम्ही गाभाऱ्यालाच सजावट करू, देखावा करणार नाही, असे जाहीर केले आहे. आता  वर्षभर मूर्ती असलेल्या मंदिराच्या गाभाऱ्यात त्यांनी मूर्ती ठेवली तर समोरील अरुंद रस्त्यावर गर्दी उसळू शकते आणि शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमाचा बोऱ्या उडू शकतो. त्यामुळे अशा मंडळांच्या श्रींच्या दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक ठरेल आणि कोरोनाचा संसर्ग न होण्याची खबरदारी घेता येईल.

- महत्त्वाची बातमी : रेशन कार्ड नसले तरी मिळणार ५ किलो तांदूळ, तोही मोफत

गणेशोत्सवाच्या अर्थकारणाचा मुद्दाही चर्चेत येतो. या उत्सवाचा लाभ हातावर पोट असलेल्या विक्रेत्यांपासून शेतकऱ्यांपर्यंतच्या साखळीला होतो. त्यांचाही विचार केला पाहिजे. सजावटीच्या वाचलेल्या खर्चातून यांतील हातावर पोट असलेल्यांना मदत करता येईल का, याचीही चर्चा व्हावी. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात 2008 च्या स्वाईन फ्लू आधीही अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी उत्सवातील उत्साह मावळण्याची भीती निर्माण झाली होती, पण न डगमगता पुणेकरांनी उत्सव थाटात साजरा केला होता. पानशेत धरणफुटीच्या 1961 च्या घटनेनंतर उभारलेल्या तात्पुरत्या घरांत पुणेकरांनी गणपती बसवले होते. पुण्यात 1965 मध्ये हल्याची  दंगल आणि पाकिस्तानचा हल्ला असं संकट उत्सवावर आलं आणि मिरवणूक चार तासांत आवरा, असा आदेश निघाला. पुणेकरांनी त्याही वर्षी उत्सव केला आणि मिरवणुकीतच भारताच्या विजयाची बातमी समजल्याने मिरवणुकीचा जोश आणखी वाढला होता. उत्सव चालू झाल्यानंतरच्या पहिल्या काही वर्षांतच लोकमान्य टिळकांना अटक झाल्यानं उत्सवावर निराशेचं सावट आलं, पण उत्सवाच्या आदल्या दिवशी टिळक सुटले आणि त्यांनी उत्सवाच्या तयारीबाबत विचारलं. तेव्हा रातोरात तयारी करून उत्सवाचा बार कार्यकर्त्यांनी उडवल्याची नोंद अभ्यासक मंदार लवाटे सांगतात.

- 'परीक्षा रद्द करण्याच्या मुद्यावर चर्चा करा'; कुलगुरूंकडे कुणी केली ही मागणी!

इतिहासातील या सगळ्या संकटापेक्षा मोठं संकट कोरोनाच्या रूपानं आलं आहे. लॉकडाऊनमुळं त्याची  गती मंदावली असली तरी त्याचे चटके आपल्याला बसत आहेतच. लॉकडाऊन केले नसते तर देशातील एक कोटी जणांपर्यतच्या नागरिकांना कोरोनाची  बाधा झाली असती. आताही संसर्गाचे प्रमाण पाहता जुलैपर्यंत नऊ ते दहा लाख जणांना त्याची बाधा होण्याची आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण दोन ते तीन टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत उत्सवात आपण एकमेकांपासून सुरक्षित अंतर न ठेवल्यास हा आकडा आणखी वाढू शकतो.

उत्सवाला अजून 92 दिवस आहेत, पाहू पुढे अशीही एक प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून येते. मात्र उत्सवाचे नियोजन आपण किमान चार ते पाच महिने आधी करत असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आतापासूनच तयारी केल्यास गणपती बाप्पा आपले विघ्न निश्चितच दूर करेल.

- पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा