

आव्हानात्मक खरिपाला कसे तोंड द्याल?
.....................................
येत्या खरीप (सन २०२६-२७) हंगामासाठी भारतीय कृषी क्षेत्रासमोर आव्हानांचा दुहेरी पेच निर्माण झाला आहे. अशा आव्हानात्मक काळात ‘संकट आल्यावर उपाय’ करण्यापेक्षा ‘सक्रिय संरचनात्मक लवचिकता’ निर्माण करण्यावर आधारित सज्जता असावी.
पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे खतांचा पुरवठा साखळी विशेषतः युरिया, डीएपी, गंधक आणि ऊर्जा आयातीला धोका निर्माण झाला असून, खतांवरील अनुदानाचा खर्च दोन लाख कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे २०२६ मधील ‘एल निनो’च्या अंदाजामुळे (सरासरीच्या ९२ टक्के पाऊस) आर्द्रतेच्या कमतरता आणि उष्णतेच्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या देशाची अन्नसुरक्षा आणि ग्रामीण उपजीविका सुरक्षित करण्यासाठी सर्व संबंधित कृषी संशोधन व विस्तार संस्थांनी योग्य तो कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
धोरणात्मक जोखीम मूल्यमापन
पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणामामुळे खतांची संवेदनशीलता निर्माण झाली आहे. भारत युरियासाठी ६३ टक्के आणि डीएपीसाठी ३२ टक्के आखाती देशांवर अवलंबून आहे. ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मूझ’ मधील अडथळ्यांचा थेट परिणाम खतांच्या उपलब्धेवर होतो. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे (अंदाजे > १०० $ / बॅरल) शेतीची यांत्रिकीकरण (डिझेल) आणि वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील देशांना होणारी ११.८ अब्ज डॉलरची कृषी निर्यात (तांदूळ, कांदा, मसाले) धोक्यात येऊ शकते.
‘एल निनो’मुळे या वर्षी पावसाची तूट आहे. सरासरीपेक्षा कमी पावसाच्या शक्यतेमुळे भात, मका आणि कडधान्य यासारख्या खरीप पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. एल निनो वर्षात उष्णतेच्या लाटा तीव्र होतात, ज्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान आणि पशुधनाच्या मृत्यूचे प्रमाण वाढू शकते.
कृती मुद्दे
हवामान अनुकूल वाण : भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे राबविले जाणारा National Innovations for Climate Resilient Agriculture (NICRA) प्रकल्पामार्फत विकसित उष्णता प्रतिरोधक आणि कमी कालावधीच्या वाणांचा प्रसार वेगवान करणे गरजेचे आहे. पारंपरिक आयातीत खतांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर घेणे आवश्यक आहे. खतांचा वापर कार्यक्षम करण्यासाठी फर्टिगेशन वेळापत्रक प्रमाणित करणे, ज्यामुळे प्रति एकर खताची गरज कमी होईल. अशा वेळी आपत्कालीन योजना गतिमान कराव्या लागणार आहेत. देशातील सर्व जिल्ह्यांसाठी, ‘जिल्हा कृषी आपत्कालीन योजना’ (DACP) अद्यावत करणे, ज्यात हवामान बदलासोबतच जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे या परिस्थितीचा अंतर्भाव असेल. ‘किसान सारथी’ आणि ‘एआय’ आधारित व्यासपीठांचा वापर करून रियल टाइम हवामान सल्ला आणि कीड सर्व्हेक्षण माहिती पुरवावी लागणार आहे.
निविष्ठा व्यवस्थापन आणि बफर स्टॉकिंग
जिल्हास्तरावर युरिया आणि डीएपीचा किमान २१ दिवसांचा राखीव साठा ठेवणे अनिवार्य आहे. खरीप पेरणी अयशस्वी झाल्यास ‘प्लॅन बी’ म्हणून दुष्काळ प्रतिरोधक तृणधान्ये आणि तेलबियांच्या सामुदायिक बियाणे बँका स्थापन करव्या लागतील. पिकांना जीवदान देण्यासाठी सिंचनाला प्राधान्य देणे आणि कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी कडक आवर्तन वेळापत्रक पाळावे लागेल. ‘प्रति थेंब अधिक पीक’ योजनेअंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचनासाठी अनुदान प्रक्रियेला गती द्यावी लागेल.
धोरणात्मक पाठबळ
अतिरिक्त अनुदान तरतूद : जागतिक किमतीमधील वाढीचा भार शेतकऱ्यांवर पडू नये म्हणून केंद्र सरकारने खत अनुदानात २०-२५ टक्के अतिरिक्त वाढीची तयारी ठेवली पाहिजे. निर्यात मार्गांमधील अडथळ्यांमुळे कांदा आणि मसाल्यांच्या पिकांच्या देशांतर्गत किंमतीत होणारी अस्थिरता रोखण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधीचा सक्रिय वापर होणे आवश्यक आहे. संवेदनशील जिल्ह्यांमध्ये १०० टक्के पीक विमा नोंदणी सुनिश्चित करणे आणि उपग्रहावर आधारित उत्पादन अंदाज वापरून क्लेम सेटलमेंट जलद करणे हे पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत करणे गरजेचे आहे. मॉन्सून सुरू होण्यापूर्वी मनरेगाची कामे जलसंधारण संरचना (अमृत सरोवर) आणि पारंपरिक जल कुंभामधील गाळ काढण्याकडे वळवावे लागेल.
२०२६ ची सज्जता ही ‘संकट आल्यावर उपाय’ करण्यापेक्षा ‘सक्रिय संरचनात्मक लवचिकता’ निर्माण करण्यावर आधारित असावी. आयातीत जीवाश्म इंधन आधारित निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून आणि हवामान-स्नेही तंत्रज्ञानाचा वापर करून भारत सध्याच्या भौगोलिक-राजकीय आणि हवामान विषयक आव्हानावर मात करू शकतो.
- डॉ. किरण कोकाटे, माजी उपमहासंचालक, कृषी विस्तार, भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली
........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.