esakal | भाजप पदाधिकाऱ्यासह ८ जणांना अटक; गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी पुरवली होती आलिशान गाडी
sakal

बोलून बातमी शोधा

Gajanan_Marne

मारणेच्या मिरवणुकीत 300 ते 400 वाहने होती.

भाजप पदाधिकाऱ्यासह ८ जणांना अटक; गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी पुरवली होती आलिशान गाडी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी आलिशान वाहन पुरविणाऱ्या भाजपच्या एका पदाधिकाऱ्यासह आठ जणांना कोथरुड पोलिसांनी अटक केली. त्याचबरोबर 6 आलिशान वाहने जप्त करण्यात आली.

मारणेला कार पुरविणाऱ्या राहुल दळवी याच्यासह 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दळवी हा वडगाव शेरीतील भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. त्याने वडगाव शेरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नारायण गलांडे यांच्याकडून कामासाठी त्यांची कार घेतली होती. त्याच्याकडून आलिशान कारसह 6 वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत, असे कोथरूड पोलिसांनी सांगितले.

सदाशिव पेठेतील खानावळ सील; कोरोनाचे नियम न पाळल्याने पुणे महापालिकेचा दणका​

मारणेच्या मिरवणुकीत  300 ते 400 वाहने होती. या वाहनाच्या मालकांचाही पोलिसांकडून आता शोध घेतला जात असून त्यांच्यावरही पोलिसांकडून लवकरच कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

गजा मारणेसह सराईत गुंड अंडरग्राऊंड
गुंड गजा मारणे याच्या सुटेनंतर निघालेल्या मिरवणुकीवरुन पोलिसांवर जोरदार टीका झाल्यानंतर, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याची गांभीर्याने दखल घेत पुणे पोलिसांचे कान टोचल्यानंतर अखेर पुणे पोलिसांनी गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी पाऊल उचलले. पोलिसांकडून होणाऱ्या अटकेच्या कारवाईच्या भितीपोटी मारणे आणि त्याचे साथीदार फरारी झाले आहेत. तर दुसरीकडे पोलिसांकडून आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापेमारी, घरझडत्यांबरोबरच तांत्रिक विश्‍वलेषणाद्वारे शोध घेतला जात आहे. 

पुणे जिल्ह्यात लॉकडाउन? सोशल मीडियातील व्हायरल व्हिडिओवर जिल्हाधिकाऱ्यांच स्पष्टीकरण

तळोजा कारागृहातुन सुटल्यानंतर मारणेची तळोजा ते पुण्यापर्यंत शेकडो वाहनांच्या गर्दीत जंगी मिरवणूक काढण्यात आली. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून गुंडांकडून वातावरण निर्मिती करण्यास सुरूवात झाली. मिरवणुकीदरम्यान, मारणे आणि त्याच्या साथीदारांकडून ठिकठिकाणी कायद्याचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे प्रारंभी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मारणेविरुद्ध पहिला गुन्हा दाखल केला. त्यानंतर कोथरुड पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, मिरवणुकीचे व्हिडीओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांवर जोरदार टीका करण्यात आली, तर शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत "कारागृहातून सुटलेल्या गुंडाची मिरवणूक निघणे ही समाजस्वास्थासाठी चांगली बाब नाही,' अशा शब्दात पोलिसांचे कान टोचले. 

उलट्या काळजाचा बाप; जन्मदात्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच केलं पाप​

पोलिसांकडून गुंडांचा रात्रं-दिवस शोध 
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांच्याकडूनही मारणेच्या मिरवणुकीची गांभीर्याने दखल घेऊन कारवाईला सुरूवात करण्यात आली. त्यामध्ये गजा मारणेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, गैरकायद्याची मंडळी एकत्रित करून दहशत निर्माण करणे, कोरोनासंबंधी नियमांचे उल्लंघन करणे असे गुन्हे दाखल करीत काहीजणांना अटक केली. त्याचबरोबर मारणेच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या अलिशान वाहनांसह अन्य वाहने ताब्यात घेण्याच्या कारवाईला सुरूवात करण्यात आली होती.

दरम्यान, उपमुख्यमंत्र्यांच्या टीकेनंतर शुक्रवारपासून वारजे आणि कोथरुड पोलिसांकडून गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यासाठी शोधमोहिम सुरु केली. त्यामुळे मारणे व त्याचे साथीदार फरारी झाले आहेत. पोलिसांकडून आरोपी जेथे लपून बसले असतील, अशा संशयित ठिकाणी रात्री-अपरात्री छापेमारी, आरोपींच्या घरझडत्या करून तांत्रिक विश्‍लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेतला जाऊ लागला आहे. 

आश्रय देणारे, मदत करणाऱ्यांवर होणार कारवाई, आरोपींच्या मालमत्ताही होणार जप्त 
संबंधित आरोपींना आश्रय देणारे, त्यांना मदत करणाऱ्यांचीही पोलिसांकडून माहिती काढली जात असून त्यांच्यावरही पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. आरोपींच्या जंगम, स्थावर मालमत्ता, बॅंक खात्याची माहिती घेणे सुरू आहे. आरोपी मिळून न आल्यास त्यांच्या मालमत्ता पोलिसांकडून जप्त केल्या जाणार आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)