पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्याची ही शेवटची संधी : डॉ. जेन गुडाल

Dr-Jane-Goodall
Dr-Jane-Goodall

पुणे : संपूर्ण जीवसृष्टी माणूस स्वतःला प्रतिभावान समजतो. पण हे पूर्णतः खोटे असून, इतर प्राण्यांनाही भाव, भावना आणि बुद्धिमत्ता आहे. फरक एवढाच की प्राणी त्याचा वापर निसर्गाच्या भल्यासाठी करतात, तर माणूस फायद्यासाठी. म्हणूनच हवामान बदलाच्या भीषण परिणामांसमोर आपण उभे आहे. येणाऱ्या पिढ्यांना सुरक्षित भविष्य प्रदान करायचे असेल, तर ही अखेरची संधी आहे, अशी तळमळ डॉ. जेन गुडाल यांनी व्यक्त केली.

डॉ. जेन पहिल्या अशा व्यक्ती आहे ज्यांना चिंपांझीने आपल्या कुटुंबाचे सदस्य मानले. त्यातूनच पुढे चिंपांझींच्या बुद्धिमत्तेबरोबरच प्राण्यांच्या भाव-भावनांबद्दल मानवी जगाला समजले. पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये आयोजित ऑनलाइन चर्चासत्रात डॉ. जेन बोलत होत्या. महोत्सवाच्या आयोजक डॉ. मंजिरी प्रभू यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 

चिंपांझीच्या कुटुंबाने तुम्हाला कसं स्वीकारलं 
डॉ. जेन म्हणाल्या, 'माझ्या आईचा वारसा माझ्यात आला आहे. शाळेच्या वर्गखोल्यांपेक्षा मला बाहेर निसर्गात फिरायला जास्त आवडायचे. लहानपणापासून मला कुत्र्यांची आवड होती. आमच्या शिक्षिकाही मला प्राण्यांचा आदर करायला शिकवत. त्यातूनच माझी ही आवड विकसित झाली असावी. 1960मध्ये टांझानियाच्या गॉम्बी नॅशनल पार्कमध्ये माझी प्रथमच चिंपांझीची भेट झाली. त्यावेळी मी त्यांना छोटेसे 'जुगाड' बनवताना (टूल) पाहिले. त्यांच्या समस्या, भाव भावना यांच्याशी मी निसर्गाच्या माध्यमातून जोडली गेली. आफ्रिका आणि केनियातील जंगलाशी जोडलेली नाळेतून निर्सगाबद्दल मला आत्मीयता तयार झाली. पुढे जाऊनच नॅशनल जिओग्राफिचा प्रसिद्ध 'मिस गुडाल्ल ऍण्ड वाइल्ड चिंपाझी' ही डॉक्‍युमेंटरी पुढे आली. या काळात लोक मला चिंपांजीच्या कुटुंबाचे सदस्य मानत होते.

जीवसृष्टीत माणूस विशेष नाही 
माणूस स्वतःला इतर जिवसृष्टीपासून वेगळा आणि विशेष समजतो. आपण एक लक्षात घ्यायला हवे आपला प्रत्येक दिवस हा इथल्या परिसंस्थेवर आघात आहे. आपण निर्माण केलेल्या सेवा, सुविधांसाठी शेकडो झाडे कापली जात आहे, शेकडो टन कार्बन उत्सर्जन होत आहे. प्रतिभावान माणसाने त्याचा प्रतिभेचा वापर निसर्गाच्या ऱ्हासासाठीच केलेला दिसतो. आता हे बदलायला हवं नाहीतर मिळालेली संधीही हातची निघून जायची. 

भारत नेतृत्व करतोय 
खनिज तेल आणि कोळशाचा वापर कमी करण्यासाठी भारताने चांगले पाऊले उचलली आहे. सौर आणि पवन ऊर्जेच्या वापरात भारत जगाचे नेतृत्व करत आहे. युवकांमध्येच जगाला बदलण्याची ताकद आहे. त्यांना शाश्‍वत जीवनासाठी योग्य आणि विवेकी पर्याय निवडण्याची संधी आहे. त्यांच्यातील ऊर्जा निश्‍चितच यात बदल घडवेल असा मला विश्‍वास आहे. 

कोण आहेत डॉ. जेन गुडाल? 
चिंपांझीच्या एवढ्या जवळ जाणाऱ्या आणि आयुष्यभर त्यांच्यावर अध्ययन करणाऱ्या डॉ. जेन जगातील विशेष व्यक्ती आहे. 1934 साली लंडनमध्ये त्यांचा जन्म झालेल्या डॉ. जेन यांनी सहा दशकांपेक्षा अधिक चिंपांझीवर संशोधन केले आहे. दक्षिण आफ्रिकेतील टांझानियाच्या जंगलांतील चिंपांझीवर त्यांचा टीव्ही शो जगप्रसिद्ध आहे. त्या जेन गुडाल संस्था आणि रुट्‌स ऑर शॉट्‌स संस्थेच्या संस्थापक असून, त्याद्वारे जगभरात वन्य प्राणी आणि जिवांबद्दल कार्य केले जाते.

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com