लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती स्वीकारणार लष्कराच्या उपप्रमुख पदाची सूत्रे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 January 2021

‘दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदी असताना गेल्या वर्षभरात चांगले अनुभव आले. यामध्ये कोरोना साथीच्या काळात लष्कराने स्वतचे सामर्थ्य वाढविले आणि स्वतःला विविध पातळ्यांवर सिद्ध केले. आज दक्षिण मुख्यालयात हा माझा शेवटचा कार्यक्रम आहे.

पुणे - ‘दक्षिण मुख्यालयाच्या प्रमुखपदी असताना गेल्या वर्षभरात चांगले अनुभव आले. यामध्ये कोरोना साथीच्या काळात लष्कराने स्वतचे सामर्थ्य वाढविले आणि स्वतःला विविध पातळ्यांवर सिद्ध केले. आज दक्षिण मुख्यालयात हा माझा शेवटचा कार्यक्रम आहे. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये आता दिल्लीतील जबाबदारी स्वीकारणार आहे.’ अशी भावना दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी व्यक्त केली.

पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं

दक्षिण मुख्यालयाच्या वतीने शुक्रवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. लेफ्टनंट जनरल मोहंती सोमवारी (ता. १) लष्कराचे उप-प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. सध्याचे लष्कर उप प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी हे सेवा निवृत्त होत असल्यामुळे आता उप-प्रमुखपदाची सूत्रे लेफ्टनंट जनरल मोहंती यांच्याकडे सोपविण्यात येत आहेत. मोहंती म्हणाले, ‘गेल्या वर्षी कोरोनामुळे नागरी प्रशासनाला मदत करण्यासाठी दक्षिण मुख्यालयाच्या वतीने विविध मोहिमा राबविण्यात आल्या. तसेच या कठीण काळात आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व देशाला समजले. या काळात व्हिडिओ कॉन्फरंसिंगमुळे कोणत्याही मुख्यालयाशी तसेच महत्‍त्वाच्या चर्चांसाठी प्रत्यक्षात त्या राज्यात किंवा त्या ठिकाणी जाण्याची गरज पडली नाही. तसेच उपचारासाठीही या तंत्रज्ञानाचा वापर योग्य ठरला.’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लेफ्टनंट जनरल मोहंती यांनी गेल्या वर्षी ३१ जानेवारी २०२० रोजी दक्षिणी मुख्यालयाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. तर या वर्षभरात त्यांनी दक्षिण मुख्यालया अंतर्गत विविध कार्यांचा आढावा घेत आपातकालीन परिस्थिती व कोरोनाकाळात विविध मोहिमांसाठी प्रशासनासोबत समन्वय स्थापित केले. येत्या दोन दिवसांमध्ये ते लष्कर उप-प्रमुख म्हणून पदभार सांभाळणार आहेत.

डिम्ड कन्व्हेयनससाठी पावणे दोनशे सोसायट्यांचे प्रस्ताव 

लेफ्टनंट जनरल मोहंती हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. तसेच डोकलाम प्रश्नाबाबत असलेल्या ईस्टर्न थिएटर येथील महत्त्वपूर्ण पदावर त्यांनी काम केले आहे. त्यांना जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारताच्या सीमाभागात लष्करी मोहिमा व रसद सेवा अशा विविध कामांचा दीर्घ अनुभव आहे. वेगवेगळ्या विदेशी मोहिमांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. सेशेल सरकारचे सैन्य सल्लागार, कांगो येथे विविध राष्ट्रांच्या सैन्यतुकडीचे प्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lieutenant General CP Mohanty accept post of Deputy Chief of Army Staff