
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील ६७ ग्रामपंचातीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आरक्षणा नुसार ३३ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे.या मुळे तेहतीस गावाच्या गावकारभारिणी महिला होणार आहेत. या मुळे सरपंचपदाचे स्वप्न पाहीलेल्या गावपुढाऱ्यांनी आता उपसरपंचपदाची संधी मिळावी या इर्षेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
जुन्नर तालुक्यात एकूण १४२ ग्रामपंचायती आहेत.या पैकी मुदत पूर्ण झालेल्या ६३ ग्रामपंचायतींची ऑगस्ट महिन्यात तर चार ग्रामपंचायतींची नोव्हेंबर महिन्यांत मुदत पूर्ण झाली आहे. या सदुसष्ट ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी २०२१ रोजी होत आहे. जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार तेहतीस ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. या पैकी सर्वसाधारण गटासाठी अठरा, इतर मागास प्रवर्गातील अकरा, अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती मधील प्रत्येकी दोन आशा एकूण तेहतीस जागा महिला सरपंच पदांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.अशी माहिती गटविकास अधिकारी हेमंत गरिबे यांनी दिली.
राजकीयदृष्टीने महत्वाच्या असलेल्या तालुक्यातील ओतूर, गुंजाळवाडी (आर्वी), येडगाव, वडगाव कांदळी, राजुरी, बोरी बुद्रुक, ठिकेकरवाडी, कांदळी, मांजरवाडी, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, पिंपरीपेंढार, निमगावसावा या महत्वाच्या गावचे सरपंचपद महिलांसाठी राखीव झाल्याने सरपंचदाचे स्वप्न पाहिलेल्या गावपुढाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या सरपंच महिला झाल्यातरी गावचा कारभार उपसरपंच व ग्रामसेवकच संगनमताने पहात असतात .असा अनुभव असल्याने अनेकांनी नाही सरपंच तर उपसरपंच हा पर्याय निवडला असून त्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत ऑगस्ट महिन्यात पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकी नंतर बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. बाजार समितीत ग्रामपंचायत गटासाठी चार जागा आहेत.या गटातून निवडून आलेले काही विद्यमान संचालक पुन्हा इच्छुक आहेत. तर मागील वेळेला संधी न मिळालेले या वेळेला संधी मिळेल या अपेक्षेने पुन्हा तयारीला लागले आहेत. मात्र बाजार समितीचे संचालक होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य होणे आवश्यक असल्याने त्यांच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणुक सुध्दा महत्वाची आहे. ग्रामपंचायत निवडणूकीची परीक्षा पास झाल्या शिवाय बाजार समितीची परीक्षा देता येणार नसल्याची जाणीव असल्याने डझनभर मातब्बर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम-जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक २३ फेब्रुवारी २०१७ झाली होती. पुढील दोन वर्षात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या दृष्टीने ग्रामपंचायत ताब्यात असणे महत्वाचे मानले जाते.या मुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्यानी आपल्या गटातील व गणातील ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.
ध्वजवंदनाचा पहिलामान मिळणार- ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल १८ जानेवारी २०२१ रोजी जाहीर होणार आहे.त्या नंतर सरपंचपदाची निवड होणार आहे.सरपंचपदी विराजमान झाल्या नंतर लगेच नवीन वर्षात २६ जानेवारी २०२१ रोजी निवड झालेल्या सरपंचाला ध्वजवंदन करण्याचा मान मिळणार आहे.
(संपादन : सागर डी. शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.