मंचर 'नगर पंचायती'च्या निर्णयास विलंब; इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली

manchar
manchar

मंचर- मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी राज्याच्या नगरविकास खात्याने पाठवलेल्या प्रस्तावाला अजून निवडणूक आयोगाने मान्यता दिली नाही. तसेच राज्यातील काही ग्रामपंचायतीनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात मंगळवार (ता.29) रोजी सुनावणी होणार आहे. तांत्रिक पेच वाढल्यामुळे व मंचर ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रिया अजून न थांबल्यामुळे इच्छुक उमेदवार व त्यांचे समर्थकांची धाकधूक वाढलेली आहे.

मंचर ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रुपांतर व्हावे, म्हणून गेल्या दोन महिन्यापासून विशेषतः शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयाची लढाई सुरू आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर मंचरकरांना  ग्रामपंचायतीच्या की नगरपंचायतीच्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार, याबाबत इच्छुक उमेदवार व नागरिक संभ्रमात असल्याचे वृत्त "सकाळ"मध्ये सर्वप्रथम प्रसिद्ध झाले होते.त्यानंतर शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे, पुणे जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर, उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखेले, तालुकाप्रमुख अरुण गिरे, यांच्या शिष्टमंडळाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मंचर नगरपंचायतीची मागणी केली होती. चार दिवसात पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायतीची घोषणा शिंदे करणार असल्याचे शिवसेनेकडून त्यावेळी जाहीर केले होते.

'मराठा आरक्षणाच्या सुनावणीत घोटाळा झाला तर सरकार जबाबदार : खासदार छत्रपती...

महाविकास आघाडीचे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, आंबेगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते लक्ष्मण   थोरात ,संतोष गावडे, अल्लू इनामदार, जगदीश घीसे , राजेंद्र थोरात, जे.के थोरात यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मंचरला नगरपंचायत करावी. अशी मागणी करणारे निवेदन देऊन साकडे घातले होते. या नेत्यांनी नगरपंचायत होणारच असे पत्रक प्रसिद्धीस दिले होते.

आंबेगाव तालुक्यातील वळसे-पाटील व आढळराव पाटील या दोन दिग्गज नेत्यांमुळे मंचर नगरपंचायत होणारच असा आत्मविश्वास इच्छुक उमेदवार व नागरिकांमध्ये निर्माण झाला होता. नेत्यांनीही ही मंत्रालय पातळीवर प्रयत्नांची पराकाष्टा केली. निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी नगरविकास खात्याचे पत्र जाईल. अशी व्यवस्थाही केली. पण अजूनही निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला नाही. त्यातच भर म्हणून की काय अन्य ग्रामपंचायतीचे काही लोक औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयात सरपंच पद आरक्षणाच्या विषयी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबत धाव घेतली आहे. त्यामुळे मोठा कायदेशीर पेचप्रसंग उभा राहिला आहे. हा पेचप्रसंग पाहूनच जिल्हास्तरावरील निवडणूक आयोगाने मंचर ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे धाबे  दणाणले असून त्यांची पळापळ सुरू झाली आहे.

ग्रामपंचायती ऐवजी नगरपंचायतीची निवडणूक होणार . त्यासाठी अजून काही कालावधी मिळेल असे गृहीत धरून अनेक उमेदवारांनी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जमवाजमव केली नव्हती. मंचर ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मंचर ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी पदावर मंचर उपविभाग सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता विजय आघाव  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गुन्हेगारांच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे;पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

नगर विकास खात्याने बुधवारी( ता 23 )रोजी अधिसूचना काढली आहे. त्यानुसार मंचरच्या सीमा निश्चित केले आहेत. 30 दिवसाच्या आत कोणाच्या हरकती असल्यास मागविल्या आहेत.

अनुसूची "अ" -
संक्रमणात्मक क्षेत्राच्या अधिक तपशीलवारपणे वर्णन केलेले स्थानिक क्षेत्र : मंचर सर्वे नं. १ ते १७३ ,मंचर सर्वे नं. १७७ ,मंचर गावठाण खुद्द १७४ ते १८१,मोरडेवाडी सर्वे नं. १ ते ८१, गावठाण सिटी सर्वे नं. १ ते ९९८

अनुसूची "ब"
संक्रमणात्मक क्षेत्रातील स्थानिक क्षेत्राच्या हद्दीचा तपशील -उत्तर - एकलहरे शिव ,उत्तर पूर्व - घोडनदी-चांडोली बुद्रुक, पूर्व - चांडोली खुर्द ,दक्षिण पूर्व - अवसरी खुर्द शिव ,दक्षिण - शेवाळवाडी , दक्षिण पश्चिम-  निघोटवाडी शिव, पश्चिम - निघोटवाडी शिव,  पश्चिम उत्तर -  सुलतानपूर शिव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com