esakal | कोरोनामुळे मेट्रोचे 50 टक्के कामगार पळाले; पुणे मेट्रो प्रकल्प लांबणार!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Metro

मेट्रो प्रकल्पाचा कालावधी लांबणार आहे. परंतु, तो किती असेल, हे येत्या काही दिवसांतील घडामोडींवर अवलंबून असेल.

कोरोनामुळे मेट्रोचे 50 टक्के कामगार पळाले; पुणे मेट्रो प्रकल्प लांबणार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : देशात विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजूर, कामगारांना आपआपल्या गावी परतण्यासाठी केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केली खरी, परंतु, त्याचा फटका मेट्रोच्या पुणे आणि पिंपरीतील प्रकल्पांना बसला आहे. या विशेष ट्रेनमुळे मेट्रोचे सुमारे 50 टक्क्यांहून अधिक मजूर गावी निघून गेले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विशेष म्हणजे मेट्रोने त्यांचा सुमारे 45 दिवस सांभाळ केला होता. कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाउनमुळे मेट्रोचे काम 25 मार्चपासून बंद होते. पुणे आणि पिंपरीतील मेट्रो मार्गांसाठी सुमारे 2800 मजूर मेट्रोकडे होते. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आदी ठिकाणांहून हे मजूर आलेले होते. लॉकडाउनच्या काळात दहा ठिकाणी राहत असलेल्या मेट्रोच्या लेबर कॅंपमधील मजुरांना महामेट्रोने धान्यासह जीवनावश्यक वस्तू पुरविल्या होत्या. त्यामुळे मजूर थांबलेले होते. तसेच काम बंद असले तरी, त्यांना मजुरीही देण्यात येत होती.

- मोठी बातमी : 'या' भागातील शाळा सुरु होणार? ऑनलाइन अॅडमिशनला सुरुवात!

केंद्र सरकारने सुमारे 12 दिवसांपूर्वी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्या सुरू केल्या. या गाड्या सुरू झाल्यावर मजुरांमध्ये चुळबूळ सुरू झाली. त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या आठ दिवसांत महामेट्रोच्या लेबर कॅंपमधून सुमारे 1500 कामगार निघून गेले आहेत. सध्या महामेट्रोकडे 1287 कामगार आहेत. गावी गेलेल्या कामगारांमध्ये कुशल आणि अकुशल कामगारांचा समावेश आहे. मेट्रो प्रकल्पासाठी परराज्यातील लेबर कॉन्ट्रॅक्टरकडून मजूर पुरविले जातात. येताना त्यांच्यामार्फत आलेले मजूर जाताना स्वतंत्रपणे निघून गेल्याचेही निरीक्षण महामेट्रोच्या अधिकाऱयांनी नोंदविले.

हातावरचे पोट असलेल्यांचा संसार येणार रूळावर 

महामेट्रोचे दोन्ही शहरांतील काम 25 मार्चपासून 30 एप्रिलपर्यंत बंद होते. मेट्रो प्रकल्पासाठी मुठा नदीपात्रात गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान, मुळा- मुठा संगमाजवळ बंडगार्डन पुलाजवळ आणि बोपोडीमध्ये काम करायचे आहे. पाऊस सुरू झाल्यावर नदीपात्रात काम करण्यास जलसंपदा विभागाकडून बंदी घालण्यात येते. त्यामुळे 30 एप्रिल ते 7 जून दरम्यान नदीपात्रात काम करण्यास जलसंपदा विभागाने महामेट्रोला परवानगी दिली आहे. त्यानुसार तेथे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु, महामेट्रोला आता अन्यत्र काम करण्यासही गेल्या आठवड्यात परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता काम जोरात सुरू झाले मात्र, मनुष्यबळाची टंचाई महामेट्रोला भासू लागली आहे.

मेट्रो प्रकल्प लांबणार
मेट्रोचा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. लॉकडाउनमुळे सलग 35 दिवस काम झालेले नाही. तसेच नंतरचे 15 दिवसही मर्यादीत स्वरूपात काम झाले आहे. पुढील काळातही मेट्रोला मजुरांची उपलब्धता कशी होईल, यावर प्रकल्पाचा वेग अवलंबून असेल. परिणामी मेट्रो प्रकल्पाचा कालावधी लांबणार आहे. परंतु, तो किती असेल, हे येत्या काही दिवसांतील घडामोडींवर अवलंबून असेल.

- Big Breaking : भारतीय किनारपट्टीला धडकले महाचक्रीवादळ 'अम्फान'; बंगाल आणि ओडिसातील लाखोंचे स्थलांतर!

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महामेट्रोचे काम सुरळीतपणे सुरू आहे. मजुरांची संख्या कमी झाल्यामुळे काही मर्यादा आल्या आहेत. परंतु, त्यावर मार्ग काढण्यात येत आहे. मेट्रोचे काम मजुरांअभावी बंद पडलेले नाही. मजुरांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याला लवकरच यश येईल, अशी अपेक्षा आहे.
- हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो

- वनाज- रामवाडी : 16 किलोमीटर
- पिंपरी चिंचवड - स्वारगेट : 15.5 किलोमीटर

पहिल्या टप्प्यात मेट्रो धावणार :
- वनाज ते गरवारे महाविद्यालय - 5.7 किलोमीटर
- पिंपरी चिंचवड ते संत तुकारामनगर - 5. 5 किलोमीटर

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा