मुलाच्या आत्महत्येनंतर आईनेही उचलेले टोकाचे पाऊल...

Suicide
Suicide

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथील २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या आईने देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.  

ओंकार दीपक ढोबळे (वय २१)  असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या आईने देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना तातडीनं जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आधी मुलगी आकस्मीक गेली आणि आता मुलाने आत्महत्या केल्याने ढोबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दीपक ढोबळे हे माणिकडोह येथे शेती करून आपली उपजीविका करत कुटुंबासोबत राहत होते. परंतु, नियतीला हे सुख मान्य नव्हतं. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीचं आकस्मिक निधन झालं होतं. तेव्हा ढोबळे कुटुंबावर मोठा आघात झाला होता. मुलीच्या मृत्यूच्या दुःखातून सावरत ढोबळे हे कुटुंबासह पुन्हा शेती कामाला लागले होते. परंतु, त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये  शेतमालाचे बाजारपेठेअभावी मोठं नुकसान झाले.  अनेक आर्थिक अडचणींचा सामना करत असताना त्यांच्या मुलाने मानसिक तणावातून नैराश्य आल्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आज आत्महत्या केली.

घरातील तरुण मुलानं आत्महत्या केल्याचे ढोबळे यांना समजल्यानंतर त्यांनी शेतीकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांची पत्नी एकटीच घरी होती. मुलाच्या आत्महत्येची बातमी समजल्यानंतर त्या माऊलीने देखील पोटची दोन्ही लेकरं गमावल्याच्या दुःखातून शेतात फवारण्यासाठी आणलेलं औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तत्काळ जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com