खेड तालुका हादरला, दोन तरुणांचा खून

राजेंद्र सांडभोर
Saturday, 8 August 2020

खेड तालुक्यातील शिरोली येथील खापरदरा वस्तीजवळील हरणटेकडीवरील रानात दोन युवकांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निघृण खून केल्याची घटना रात्री घडली. हा प्रकार आज सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली.

राजगुरूनगर (पुणे) : खेड तालुक्यातील शिरोली येथील खापरदरा वस्तीजवळील हरणटेकडीवरील रानात दोन युवकांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निघृण खून केल्याची घटना रात्री घडली. हा प्रकार आज सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली. महानगरपालिका परिसरातील हे युवक असून, ते जुन्या वादातून एकाचा काटा काढण्यासाठी शिरोली येथे आले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हाॅट्सअपवर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत मंगेश गुलाब सावंत (रा. शिरोली) यांनी फिर्याद दिली आहे. खापरदरा येथील हरण टेकडीवर दोन जणांचे मृतदेह टाकले असल्याची माहिती समजल्यानंतर सावंत त्या ठिकाणी गेले. तेव्हा त्यांना २८ ते ३० वयोगटातील दोन तरुणांचे मृतदेह पडलेले दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर, हातावर, डोक्यावर वार होते. या दोघांचा अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी ही माहिती खेड पोलिस ठाण्यात दिली.

पोलिस बनून हाॅटेलमध्ये शिरले, जेवले अन्...

दरम्यान, अन्य सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल (शुक्रवारी) पिंपळे गुरव येथील एका तरुणाला कोयता बाळगल्याप्रकरणी खेड पोलिसांनी अटक केली होती. खून झालेले दोघजण त्याचे मित्र असल्याची माहिती पुढे आली आहे. ते तिघे जण गेल्या दोन- तीन दिवसांपासून शिरोली परिसरात वावरत होते. कोयता बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे आणि शिरोली गावातील काही जणांचे दीड वर्षापूर्वी गावात पाणपोई उभारण्यावरून वाद झाले होते. त्यातील एकाचा काटा काढण्यासाठी तो आपल्या मित्रांसह शिरोली परिसरात वावरत होता, अशी चर्चा आहे. कोयता प्रकरणातील संशयिताने पिंपळे गुरव परिसरात काहीतरी गुन्हा केला होता. त्यामुळे तेथील पोलिस त्याच्या शोधात होते. त्यांनी खेड पोलिसांशी संपर्क साधून संबंधित संशयित या परिसरात असल्याची शक्यता वर्तविली होती. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली, तेव्हा त्याच्याकडे कोयता सापडला. या संशयित आरोपीचे शिरोली येथे नातेवाईक आहेत. म्हणून तो या ठिकाणी येत होता.

दौंडमध्ये म्हशीला झालं जुळं

उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेल्या दोघांच्याही डोक्यावर आणि अंगावर धारदार हत्याराने वार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा खून झाला आहे, हे स्पष्ट होत आहे. दोघाही युवकांची ओळख पटली आहे, पण तपासात अडसर नको, म्हणून आम्ही ती जाहीर करीत नाही, असे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of two youths in Khed taluka