संभाजी बिडीचं नाव बदललं; संभाजी ब्रिगेडच्या लढ्याला यश

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

राज्य सरकारनेही अशा मुद्यावर पुढाकार घेत महापुरुषांची बदनामी थांबविण्यासाठी पुढे आले पाहिजे. हा संघर्ष केवळ सामाजिक संघटनानी आणि शिवप्रेमींनी करणे योग्य नाही.

पुणे : राज्यात साबळे वाघिरे व्यवसाय समूह छत्रपती संभाजी महाराजांचे नाव वापरून बिडीचे उत्पादन करत आहेत. राष्ट्रपुरुषांचे नाव वापरून तंबाखूजन्य पदार्थाचे उत्पादन बंद करण्यात यावे, अशी मागणी आम्ही अनेक वर्षे करत होतो. तसेच आमच्याबरोबर अनेक संघटनांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. या मागणीच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे, असे संभाजी ब्रिगेड केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर यांनी सांगितले. 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने सुरु असलेल्या बिडीचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. मात्र या मागणीला संबंधित कंपनीकडून हवा तसा प्रतिसाद दिला जात नव्हता. मागील वर्षी कंपनीने नाव बदलण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही. अखेर संभाजी बिडी हे नाव बदलण्यात आले आहे.

महत्त्वाची बातमी: सरळसेवा भरतीचा मार्ग मोकळा; कंपन्यांच्या नावावर शिक्कामोर्तब​

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने विकल्या जाणाऱ्या 'संभाजी बिडी' आता 'साबळे बिडी' या नावाने विक्री होणार आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडसह इतर अनेक संघटनांच्या लढ्याला यश आले आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने हा लढा २००३ मध्ये पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केला होता. या मुद्यावर कंपनीने आश्वासन दिले परंतु कार्यवाही होत नव्हती. परंतु आंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी या उत्पादनाच्या माल पुरवणाऱ्या गाड्यांवरील नाव तसेच ठेवले होते. 

बंगालच्या मातीचं होतंय सोनं; पुण्यात फसवणुकीचा अजब प्रकार उघडकीस​

कोल्हापूर येक्षे ऑगस्टमध्ये संभाजी ब्रिगेडने जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संभाजी बिडीची गाडी पकडली होती. ज्या ठिकाणी विक्री केली जात होती त्या व्यापाऱ्यांना संभाजी ब्रिगेडने विरोध करण्यास भाग पाडले. कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी साबळे-वाघिरे कंपनीला २० लाखांचा परत पाठवला होता. त्यानंतर १० सप्टेंबर २०२० रोजी कंपनीने पत्रकार परिषद घेत नाव बदलणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता हे नाव बदलण्यात आले आहे. 

सीरममधील आगीसंदर्भात आलं महत्त्वाचं अपडेट; तपास पथकानं दिली माहिती​

राज्य सरकारनेही अशा मुद्यावर पुढाकार घेत महापुरुषांची बदनामी थांबविण्यासाठी पुढे आले पाहिजे. हा संघर्ष केवळ सामाजिक संघटनानी आणि शिवप्रेमींनी करणे योग्य नाही. येथून पुढे कोणीही राष्ट्रपुरुषांचा अवमान केल्यास आम्ही तो सहन करणार नाही. सावळे वाघिरे कंपनीने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, परंतु या निर्णयास खूप उशीर झाला ही खंत आमच्या मनात राहील, असे पासलकर यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: name of Sambhaji Bidi was changed due to constant demands of Sambhaji Brigade