‘पीएमआरडीए’ आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

kirkarwadi
kirkarwadi

किरकटवाडी - जानेवारी २०१९ पासून काम सुरू असलेला नांदोशी-किरकटवाडी रस्ता अद्यापही खड्ड्यातच असून पीएमआरडीए आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याच्या प्रकारामुळे नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करताना अक्षरश- तारेवरची कसरत करावी लागत आहे.

किरकटवाडीतील शेकडो सदनिकाधारक, स्थानिक रहिवासी तसेच नांदोशी- सणसनगर येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी नांदोशी-किरकटवाडी रस्ता हा एकमेव पर्याय आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची झालेली दुरवस्था आणि त्यावरुन होणारी अवजड वाहतूक यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. खड्डे आणि धुळीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन पीएमआरडीएच्या माध्यमातून या रस्त्याचे काम मंजूर करून घेतले. ३ जानेवारी २०१९ पासून रस्त्याच्या कामाला सुरवात झाली होती, परंतु काही स्थानिक शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कामाला कोर्टात आव्हान दिले होते. संबंधित ठिकाणी कोर्टाने सात मीटर रुंदीचा रस्ता करण्याची परवानगी दिली. त्यानंतर मात्र रस्ता होईल असे वाटत असताना पुन्हा नागरिकांच्या पदरी निराशाच पडली आहे. पीएमआरडीए आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याच्या प्रयत्न करत आहेत.

किरकटवाडी, नांदोशी येथील शिष्टमंडळाने १५  जानेवारी २०२१ रोजी नांदोशी रस्त्याचे काम मार्गी लागावे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यावेळी तातडीने काम मार्गी लावले जाईल व बंदोबस्त देण्याबाबत पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्याशी चर्चा केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळाला सांगितले होते.

नरेंद्र हगवणे (ग्रामपंचायत सदस्य) - ज्याप्रमाणे निर्देश आहेत, त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी काम करावे, तसेच कायदेशीर मार्गांचा अवलंब करून नागरिकांना या रस्त्याच्या समस्येतून मुक्त करावे. 

कालिदास चावट (रहिवासी) - पीएमआरडीए, जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. सध्या या रस्त्यावर जीवघेणे खड्डे झाले आहेत. अधिकारी एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत काय? 

प्रकाश पवार (सदनिकाधारक) - पीएमआरडीएची मंजुरी असल्याने आज ना उद्या रस्ता होईल, या आशेवर घर खरेदी केले. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम होणार आहे, हेच ऐकत आलो आहे. माझ्यासारख्या अनेकांचा या रस्त्याचे काम रखडल्याने भ्रमनिरास झाला आहे. 

दरवेळेस वेगवेगळी कारणे
शेतकरी आडवे येतात, स्थानिक पदाधिकारी सहकार्य करीत नाहीत, पोलिस बंदोबस्त मिळत नाही, डांबर प्लॅंट बंद आहे, पावसाळा जाऊद्या, जिल्हा परिषदेचे अधिकारी सहकार्य करीत नाहीत, पोलिसांचे पत्रच मिळाले नाही, ठेकेदाराची माणसे निघून गेलीत अशी दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून कामास विलंब केला जात आहे. अनेक वेळा पीएमआरडीएचे अधिकारी फोन उचलण्याचे कष्ट घेण्याचेही टाळत आहेत.

ठेकेदाराची तयारी नसल्याने काम सुरू होऊ शकले नाही. आम्ही चार  दिवस बंदोबस्त मागविला असून, त्या तारखाही पोलिस प्रशासनाला कळविल्या आहेत. येत्या काही दिवसांत काम मार्गी लागेल. 
- राजेंद्र लोखंडे, उपविभागीय अभियंता, पीएमआरडीए

२२ जानेवारीला बंदोबस्त मंजूर असल्याचे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना कळवले होते. त्यांच्याकडून तयारी नसल्याचे कळले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक तेव्हा पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
- सदाशिव शेलार, पोलिस निरीक्षक, हवेली पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com