मराठी चित्रपट ‘युनिव्हर्सल’ होण्याची गरज - कुलकर्णी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चित्रपटांच्या वितरणासाठी प्रयत्न करीत असून, राज्य सरकारशी बोलून तालुक्‍याच्या ठिकाणी काही चित्रपटगृहे याशिवाय टुरिंग टॉकीज अशा संकल्पनांवर चर्चा सुरू आहे. 
- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

पुणे - ‘‘मराठी भाषिक प्रेक्षक मल्याळम चित्रपट ‘सबटायटल’वरून आवडीने पाहतो, अशाच पद्धतीने इतर भाषेतील प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे आकर्षित झाले पाहिजेत. यासाठी मराठी निर्माते, दिग्दर्शकांनी सर्वसमावेशक चित्रपटांची निर्मिती करावी. यातूनच मराठी चित्रपट ‘युनिव्हर्सल’ होतील,’’ असे प्रतिपादन दिग्दर्शक डॉ. सलिल कुलकर्णी यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत आज चित्रपटांचे ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्म आणि यशस्वी मार्केटिंग या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महामंडळाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्यासह अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अजय फुटाणे हेही उपस्थित होते.

महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्‍टरांची रिक्त पदे भरणार 

कुलकर्णी म्हणाले, ‘‘आपले चित्रपट चित्रपटगृहात टिकावेत, यासाठी दिग्दर्शक व निर्मात्यांनी चित्रपटाच्या कथेकडे लक्ष दिले पाहिजे. आपले चित्रपट नाटकासारखे दिसता कामा नयेत हा विचारही तितकाच महत्त्वाचा आहे.’’ लांजेकर म्हणाले, ‘‘तुमच्या डोक्‍यात चित्रपटाविषयी अनेक क्रिएटिव्ह गोष्टी असतात; मात्र मार्केटिंगच्यादृष्टीने त्या बरोबर असतीलच असे नाही. त्यामुळे मार्केटिंगचा विचार करूनच चित्रपट लिहिला जावा.’

पुण्यातील ‘खडकवासला’ची वीज कधी होणार चालू वाचा

‘पिफ’मध्ये आजचे विशेष चित्रपट
मोसाद : इस्त्रायलची मोसाद हे गुप्तहेर संघटन धाडसी मोहिमांसाठी ओळखले जाते. म्युनिकमधील हत्याकांड, तसेच विमान अपहरणानंतर या संघटनेने केलेली मोहीम सर्वश्रुत आहे. त्याच पठडीतील हा चित्रपट. एका दहशतवादी संघटनेपासून मोसाद आणि सीआयएकडून एक मोहीम आखली जाते. त्याचे यात चित्रण आहे. 
चित्रपटगृह : पीव्हीआर, दुपारी १२.३० वाजता

स्नफ टेप : एक महिला लैंगिक अत्याचाराची चित्रफीत पाहते. त्यानंतर भूतकाळात घडलेली घटना तिला स्वस्थ बसू देत नाही. त्यातून ती काही निर्णय घेते. तिच्या भावनांना व्यक्त करणारा हा चित्रपट आहे.
चित्रपटगृह : पीव्हीआर, दुपारी ४ वाजता

निर्वाणा इन : पर्यटकांची बोट घेऊन जाणारा तिचा चालक बोटीला जलसमाधी घडवून आणतो. त्यात पर्यटक मारले जातात; परंतु चालक वाचतो. पुढे हिमालयातील एका रिसॉर्टमध्ये काम करू लागतो. त्याचा हा नाट्यमय प्रवास यात दिसतो.

वाय (मराठी) : स्त्रीभ्रूणहत्या ही देशातील एक मोठी समस्या आहे. अनेक वेळा, अनेक अंगाने या विषयावर चर्चा झालेली आहे; पण या समस्येचे आणखी वेगळे कंगोरे दाखविणारा हा चित्रपट आहे. चार वेगवेगळ्या कथांना जोडून या समस्येचे पैलू हा चित्रपट उलगडतो. एका महिलेचा लढा यात आहे.
चित्रपटगृह : आयनॉक्‍स, दुपारी १.३० वाजता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The need to become a Marathi movie Universal