

लातूरचा माजी प्राध्यापक
पी.व्ही. कुलकर्णी सूत्रधार
सीबीआयचा दावा; मनीषा वाघमारेंनी गोळा केले विद्यार्थी
नवी दिल्ली, ता. १५ (पीटीआय): देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट‘ पेपरफुटी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार लातूरचा प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. लातूरचे रहिवासी कुलकर्णी हा रसायनशास्त्र विषयातील तज्ज्ञ असून, त्याने अनेक वर्षे नीट प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये काम केले होते. अधिकृत गोपनीय माहितीचा गैरवापर करून त्यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील आपल्या घरी खास कोचिंग सत्रे घेतल्याचा आरोप आहे.
सीबीआयच्या माहितीनुसार, कुलकर्णीने विद्यार्थ्यांना प्रश्न, पर्याय आणि उत्तरे डिक्टेट केली होती. हेच प्रश्न तीन मे रोजी झालेल्या नीट परीक्षेत तंतोतंत आल्याचे तपासात समोर आले. या सत्रांसाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आधीच अटक झालेल्या मनीषा वाघमारे हि विद्यार्थ्यांना गोळा करण्यात मदत केल्याचे सीबीआयने सांगितले. गुरुवारी अहिल्यानगरमधील धनंजय लोखंडे आणि पुण्यातील वाघमारे यांना अटक करण्यात आली. तपासात प्रश्नपत्रिका फुटण्याची साखळीही उघड झाली आहे. लोखंडे याला वाघमारेकडून पेपर मिळाला आणि त्याने तो नाशिकच्या शुभम खैरनारकडे दिला. खैरनारने पुढे यश यादवकडे पेपर पोहोचवला. यादवने तो इतरांकडे फिरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात जयपूरमधील मंगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. गुरुग्राममधील यादव आणि नाशिकमधील खैरनार यांनाही सीबीआयने ताब्यात घेतले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मंगीलाल बिवाल यांनी आपल्या धाकट्या मुलासाठी फुटलेला पेपर मिळवण्यासाठी १० ते १२ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. यादवमार्फत त्यांना ५०० ते ६०० प्रश्न पुरवण्यात आल्याचा आरोप आहे. हे प्रश्न मिळाल्यास नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकेल, असे आश्वासन दिले गेले होते. सीबीआयने देशभरातील अनेक ठिकाणी छापे टाकून कागदपत्रे, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली. या उपकरणांची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवण्याचाही प्रयत्न केला जात आहे. ‘नीट’ परीक्षा तीन मे रोजी देशातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ केंद्रांवर घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एनटीएला सात मे रोजी गैरप्रकाराबाबत माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण केंद्रीय यंत्रणांकडे सोपवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.