अजित पवारांचा राजीनामा, नेटकरी म्हणतात...

टीम ई-सकाळ
Friday, 27 September 2019

अजित पवार हे राष्ट्रवादीचे बडे नेते आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री पदही त्यांनी भूषविलं आहे, त्यामुळे त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे अनेक तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.27) तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतरच्या गेल्या काही तासांनंतरही अजित पवार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे सगळीकडे पवार यांच्या राजीनाम्यामागच्या कारणांबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. खुद्द अजित पवार यांनी कोणताही खुलासा अद्याप केला नसल्यामुळे राजीमान्याचे कारण अद्यापी गुलदस्त्यातच आहे. 

अजित पवारांनी राजीनामा देण्यामागे काय कारण असू शकते, याच्या या घडीला सुरू असलेल्या चर्चा :
1. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात अजित पवार यांचे नाव आहे. या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी सुरू आहे. या चौकशीचा राष्ट्रवादीवर परिणाम होऊ नये, म्हणून...
2. साताऱयातील लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे आहे. या जागेवर राष्ट्रवादीनेच निवडणूक लढवावी, हा अजित पवारांचा आग्रह आहे. मात्र, ही जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय होऊ पाहात आहे, म्हणून...
3. कौटुंबिक कारणातून...

वरील सर्व कारणे ही सध्या राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर नजर टाकल्यास प्रामुख्याने दिसून आली. अजित पवार हे राष्ट्रवादीचे बडे नेते आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री पदही त्यांनी भूषविलं आहे, त्यामुळे त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे अनेक तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत.

काही नेटकऱ्यांनी असेही म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात अजित पवार यांचे नाव असून त्याची सविस्तर चौकशी करता यावी, म्हणून त्यांनी आपला राजीनामा दिला. याप्रकरणाचा निकाल जेव्हा केव्हा लागेल, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कोणताही परिणाम होऊ नये, असे काहीजणांना वाटते. 

आणखी एक महत्त्वाचे कारण असेही आहे की, लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तेव्हापासूनच ते नाराज झाले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकताना काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे नेतृत्व नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे देण्यात आले. त्यामुळे अजित पवार बॅकफूटवर पडले. डॉ. कोल्हे यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, अमोल मिटकरी हे चेहरे राष्ट्रवादीचे चेहरे म्हणून जनतेसमोर आले. त्यातही अजित पवार यांची छाप पडली नाही. 

काहींचे म्हणणे असेही आहे की, जेव्हापासून रोहित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा विडा उचलला आहे, तेव्हापासूनच पवार कुटुंबीयांमध्ये मतभेदास सुरूवात झाली आहे. आणि हेच सर्वांत महत्त्वाचे कारण या राजीनामा देण्यामागे असू शकते. एकूणच अजित पवारांचा राजीनामा हा केवळ आजचा विषय नसून, तो दीर्घकाळ चर्चेत राहणारा विषय बनला आहे. सोशल मीडियावर बरेच दिवस या विषयावर प्रतिक्रिया उमटणार आहेत.

आणखी महत्त्वाच्या बातम्या : 

- अजित पवारांच्या राजीनाम्यावर शरद पवार, म्हणतात... (व्हिडिओ)

- उदयनराजेंनी दिवसा केव्हाही माझ्या घरी यावे; शरद पवारांचा टोला

- शरद पवार म्हणतात, अजित पवारांनी मुलाला सांगितले...(व्हिडिओ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Netizens discuss the reasons behind the resignation of NCP leader Ajit Pawar