शब्दप्रभू राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीदिनी नवीन संकल्प

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

शब्दप्रभू राम गणेश गडकरी यांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त संभाजी उद्यान येथील मुख्य दरवाज्याजवळ त्यांच्या प्रतिमेची व साहित्याची पूजा करण्यात आली.

पुणे : महाराष्ट्राचे शेक्सपिअर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शब्दप्रभू राम गणेश गडकरी यांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त संभाजी उद्यान येथील मुख्य दरवाज्याजवळ त्यांच्या प्रतिमेची व साहित्याची पूजा करण्यात आली. तसेच त्यांचा पुतळा उभा करेपर्यंत संघर्ष करीत राहणार असल्याचा निर्धार साहित्यिक आणि कलावंतांनी केला.

कोथरुड नाट्य परिषदेच्या वतीने आज स्मरण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी गडकरी यांच्या प्रतिमेचे व साहित्याचे  पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. कै. गोविंदाग्रज यांच्या निवडक सहा कविता व रामगणेशाय नमः या पुस्तकांचे पूजन करण्यात आले. यावेळीस लेखक नाट्य कलावंत श्रीराम रानडे असे म्हणाले की आज गडकरी यांना मला वंदन करायला मिळते हे अभिमानास्पद आहे. अभिनेते विजय गोखले यांनी आपल्या भाषणामध्ये गडकरींच्या शताब्दी निमित्त त्यांच्या एकच प्याला या संगीत  नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने युवा पिढीला गडकरींची ओळख करून द्यायची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे. 

PHOTO : असा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत नवा झेंडा

रंगकर्मी योगेश सोमण म्हणाले की तीन वर्षापूर्वी ज्या समाजकंटकांनी हा पुतळा तोडला त्याचा आम्ही निषेध करतो व पुतळा बसविण्यासाठी रंगकर्मी तर्फे आंदोलन करु आणि पुतळा पुन्हा उभा राही पर्यंत संघर्ष करू. मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी म्हणाले भाषाप्रभु गडकरी हे मराठीचे वैभव आहे.

गडकरींचा पुतळा पुन्हा उभा करू असे आश्वासन पुण्याच्या कारभाऱ्यानी दिले होते. त्याचे पालन करून पुतळा लवकरात लवकर उभा करावा. विजय कुलकर्णी यांनी कुसुमाग्रजांनी राम गणेश गडकरी यांच्यावर रचलेल्या नमस्कार आहे या कवितेचे वाचन केले. या कार्यक्रमात आनंद पानसे, कवी राजन लाखे, प्रा. श्याम भुर्के, प्रा. क्षितिज पाटूकले यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

महाराष्ट्रधर्मासाठी 'अमित ठाकरे' सक्रिय राजकारणात..

कोथरुड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी प्रस्ताविक व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. यानिमित्ताने दादोजी कोंडदेव व राम गणेश गडकरी यांचे पुतळे त्वरित बसवले जावेत यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्व रंगकर्मीच्या वतीने भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New resolution to commemorate Ram Ganesh Gadkari