esakal | पुण्याच्या पाणी कोट्याबाबत निर्णय नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीतील चर्चा निष्फळ
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit_Pawar

पुणे शहराला भामा आसखेड धरणातून २.६७ टीएमसी पाणी मिळणार आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मिळणाऱ्या पाण्यात तेवढीच कपात करावी, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुण्याच्या पाणी कोट्याबाबत निर्णय नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीतील चर्चा निष्फळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : खडकवासला प्रकल्पातून पुणे शहरासाठी आणि शेतीसाठी पाण्याचा कोटा ठरविण्याबाबत जलसंपदा विभाग आणि महापालिका आपापल्या भूमिकांवर ठाम राहिले. महापालिकेला भामा आसखेड धरणातून मिळणारे पाणी आणि नव्याने समाविष्ट झालेली गावे या पार्श्वभूमीवर शहराला किती पाणी द्यायचे, याबाबत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. याबाबत सोमवारी (ता. २५) विशेष बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात २३.१८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यापैकी महापालिकेने १८.५८ टीएमसी पाण्यासोबतच टेमघर धरणातील सर्व पाणीसाठा पुणे शहरासाठी देण्याची मागणी केली. तर, जलसंपदा विभागाने पिण्यासाठी केवळ १०.०३ टीएमसी आणि शेतीसाठी १०.९० टीएमसी पाणी देण्याची भूमिका घेतली आहे. तर, कोरोनाच्या कालावधीत गावी गेलेले नागरिक शहरात परतले असून, पाण्याचा वापर वाढला आहे. टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी हे धरण रिकामे केले जाणार आहे. त्यामुळे या धरणाचे संपूर्ण पाणी शहरासाठी देण्याची मागणी खासदार गिरीश बापट यांनी केली. 

Breaking: शिवजयंतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली महत्वाची घोषणा​

पुणे शहराला भामा आसखेड धरणातून २.६७ टीएमसी पाणी मिळणार आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मिळणाऱ्या पाण्यात तेवढीच कपात करावी, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु त्याला शहरातील लोकप्रतिनिधी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शविला. महापालिकेत नवीन २३ गावे समाविष्ट झाली असून, शहराची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे पुण्याला १८.५८ टीएमसी पाणी देण्याच्या मुद्यावर लोकप्रतिनिधी ठाम राहिले. त्यामुळे या विषयावर बैठकीत तोडगा निघू शकला नाही. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी सोमवारी बैठकीत तोडगा काढण्यात येईल, असे जाहीर केले. 

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार बापट, आमदार मुक्ता टिळक, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, राहुल कुल, महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप, मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक टी. एन. मुंडे, अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, कार्यकारी अभियंता विजय पाटील बैठकीस उपस्थित होते. 

महत्त्वाची बातमी: सरळसेवा भरतीचा मार्ग मोकळा; कंपन्यांच्या नावावर शिक्कामोर्तब​

महापालिकेकडून १७.४० टीएमसी वापर 
महापालिकेकडून दररोज १४६० दशलक्ष लिटर याप्रमाणे वर्षभरात १७.४० टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुण्यासाठी ८.१६ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला असून, राज्य सरकारने ११.५० टीएमसी पाणी कोटा वाढवून दिला आहे. त्यानुसार शहराचा पाणीवापर हा सुमारे ५.९० टीएमसी जास्त असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला. परंतु महापालिकेने हा दावा फेटाळला. तसेच, महापालिकेकडे पाणीपट्टी, भाडेपट्टा आणि औद्योगिक पाणी वापरापोटी २८६ कोटींची थकबाकी असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. 

सीरममधील आगीसंदर्भात आलं महत्त्वाचं अपडेट; तपास पथकानं दिली माहिती​

यंदा दोन उन्हाळी आवर्तने घेणार 
शेतीसाठी रब्बी हंगामात ३३ दिवसांमध्ये २.७३ टीएमसी पाणी सोडल्यानंतर उन्हाळ्यात दोन आवर्तने घेण्यात येणार आहेत. पहिले आवर्तन हे २२ फेब्रुवारी ते १५ एप्रिल या कालावधीत घेतले जाणार आहे. या कालावधीत ४.४० टीएमसी पाणी शेतीसाठी सोडले जाणार आहे. त्यानंतर दुसरे आवर्तन घेतले जाणार असल्याची माहिती जलंसपदा विभागाने बैठकीत दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)