esakal | प्राथमिक आरोग्य केंद्रांना दहा दिवसांत मिळणार नव्या अँब्युलन्स!
sakal

बोलून बातमी शोधा

Ambulance

मागील चार महिन्यांत ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची रुग्णवाहिकेअभावी प्रचंड हेळसांड झाल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्या होत्या.

प्राथमिक आरोग्य केंद्रांना दहा दिवसांत मिळणार नव्या अँब्युलन्स!

sakal_logo
By
गजेंद्र बडे

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रुग्णांची रुग्णवाहिकेअभावी होणारी हेळसांड आता थांबणार आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला एक नवी कोरी रुग्णवाहिका खरेदी केली जाणार आहे. याबाबतची खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. यामुळे येत्या दहा दिवसांत या नव्या अँब्युलन्स रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून पायाभूत सुविधा या लेखाशिर्षाखाली प्रत्येकी २० लाख रुपयांप्रमाणे एकूण १८ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी रुग्ण कल्याण समित्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.

अखेर 'पीएमपी'चा मुहूर्त ठरला; 'या' तारखेपासून बस रस्त्यावर धावणार!​ 

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने मागील चार महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. मात्र राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाकडून तांत्रिक मान्यता मिळत नव्हती. ही तांत्रिक मान्यता १३ ऑगष्टला मिळाली आहे. राज्याचे आरोग्य सेवा सहसंचालक (प्राथमिक आरोग्य केंद्र) डॉ. विजय कंदेवाड यांच्या स्वाक्षरीचे तांत्रिक मान्यतेचे पत्र नुकतेच जिल्हा परिषदेला मिळाले आहे. 

यंदा पुण्यानं घेतली आघाडी; स्वच्छ शहरांच्या यादीत पुणे 'टॉप-२०'मध्ये!​

पुणे जिल्ह्यात एकूण ९६ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यापैकी खेड तालुक्यातील करंजविहिरे आणि कडूस या दोन आरोग्य केंद्रांना आमदार दिलीप मोहिते यांच्या तर, वेल्हे तालुक्यातील करंजावणे व पानशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका आधीच मंजूर झालेल्या आहेत. त्यामुळे हे चार आरोग्य केंद्र वगळून उर्वरित ९२ आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक अॅंब्युलन्स चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून दिली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले.

दरम्यान, मागील चार महिन्यांत ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची रुग्णवाहिकेअभावी प्रचंड हेळसांड झाल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्या होत्या. अनेक रुग्णांना मोठ्या रकमा मोजून खासगी अॅंब्युलन्स भाड्याने घ्याव्या लागल्या होत्या, असा आरोप सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी झेडपीच्या सर्वसाधारण सभेत केला होता.

Ganeshotsav 2020 : यंदा फुलांनी खाल्ला 'भाव'; हात राखूनच पुणेकरांनी केली खरेदी​

ग्रामीण भागातील रुग्णांसाठी अॅंब्युलन्स नव्हत्या. त्या उपलब्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत होतो. त्यात यश आले आहे. या अॅंब्युलन्स खरेदीसाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या दहा दहा दिवसांत सर्व आरोग्य केंद्रांना त्या उपलब्ध होतील.

- प्रमोद काकडे, बांधकाम व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद, पुणे.

पूर्वी केवळ मोठ्या गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अँब्युलन्स मिळाल्या होत्या. त्याही खुप जुन्या झालेल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची अॅंब्युलन्सअभावी हेळसांड होत होती. ती आता थांबणार आहे. यामुळे ग्रामीण रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

- करण खलाटे, माजी सभापती, पंचायत समिती, बारामती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top