‘ओटीटी’वरही चौकटीबाहेरचा विचार नाहीच

OTT
OTT

पुणे - गेल्या तीन दशकांत महाराष्ट्रात सामाजिक, आर्थिक आणि गुन्हेगारीविश्‍वात उलथापालथ झाली; पण त्याचे प्रतिबिंब मराठी चित्रपटांत उमटले नाही. आता वेब सीरिजमध्येही ते फारसे दिसत नाही. मराठीतील सकस साहित्य तरी या नव्या माध्यमातून मराठी जनांसमोर येतेय का, असा प्रश्‍न विचारला, तर त्याचे उत्तरही नाही असेच आहे. मराठीतील काही प्रयोग वगळता चित्रपट आणि वेबसीरिजदेखील विनोदाच्या पठडीत अडल्याचे मत दिग्दर्शकांनी व्यक्त केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउन आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ओव्हर द टॉप (ओटीटी) अर्थात इंटरनेटच्या माध्यमातून सिनेमा किंवा वेब सीरिज घराघरांत पोचल्या. त्यानंतर प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर फार कधी दिसले नाही, एवढी प्रयोगशीलता दिसू लागली. हिंदीत सेक्रेड गेम, पाताल लोक यांसारख्या सीरिजमधून नव्या दमाचे कलाकार आणि त्यांचे कामही दिसले. पण मराठी वेब सीरिजचे काय? मराठीमध्ये वेगळे प्रयोग करू पाहणारे कलाकार या प्रश्‍नाला उत्तर देतात, ते असे की ‘चौकटी बाहेरचा विचार मराठीत केला जात नाही, आणि केला तर तो चालत नाही.’

‘ताऱ्यांचे बेट’ हा चित्रपट आणि ‘हुतात्मा’सारखी वेब सीरिज दिलेले दिग्दर्शक, लेखक किरण यज्ञोपवित म्हणतात, ‘‘मराठीत विषय वैविध्याला सीमा नाही. पण ओटीटी माध्यमातही वाहिन्यांवर मराठी मालिका देणारे लोक आहेत. त्यामुळे वेब सीरिजही टीव्हीवरच्या मालिकाच बनतात. कदाचित निर्मात्यांची मागणी हे कारणही त्याला असेल. लोक पाहतील काय, याचा विचार करूनच लिहिले जाते. त्यामुळे नवे, हटके असे काही निर्माण होत नाही.’’

मराठी चित्रपटांचे पटकथा लेखक क्षितिज पटवर्धन म्हणाले, ‘‘मराठीत चांगली निर्मिती मूल्ये तयार होत नाही, अशी तक्रार केली जाते. हा मुद्दा आहेच; पण समस्या ही मोठ्या विचार आणि दृष्टीचा अभाव याची आहे. सिनेमाचा लेखक जुन्या मराठी साहित्याचा अभ्यास करीत नाही. पण हा विचार नव्या लेखकांनी केला पाहिजे, मोठा विचार मांडून आजच्या काळात अभिजात निर्मिती केली पाहिजे, तर मराठीत चांगल्या कलाकृती तयार होतील.’’

गेल्या अनेक दशकांत मराठी प्रांतात असंख्य घडामोडी घडल्या; पण त्यावर कुणीही मराठीत काही लिहिले नाही आणि पडद्यावर दाखविले नाही. या घडमोडी भव्यतेने मांडल्या, त्या अन्य भाषिक लोकांनी. मराठीत अजरामर असे प्रचंड साहित्य आहे. त्याला आजच्या युगाची जोड देऊन नवे देण्याचा प्रयत्न केला, तर प्रेक्षकही नवे स्वीकारतील. कारण यापूर्वी मराठीत झालेले प्रयोग देखील लोकांनी स्वीकारले आहेत.
- क्षितिज पटवर्धन, पटकथा लेखक

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com