बा विठ्ठला! पंढरीची वारी यंदा चुकू दे हरी

wari
wari

पुणे - दरवर्षी ज्येष्ठ-आषाढ महिन्यांत मराठी मनाला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. वारी म्हणजे महाराष्ट्राचं मोठं सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक संचित होय. मराठी माणूस कोणाला म्हणावं, मराठीपणाची एक व्याख्या अशीही केली जाते की, अभंगात आणि लावणीत रममाण होतो, तो मराठी. थोर विदुषी इरावती कर्वे यांनी केलेली महाराष्ट्राची एक व्याख्याही वारीचं महत्त्वं अधोरेखित करते. ज्या प्रदेशातील लोक वारी करतात, त्याला महाराष्ट्र म्हणतात.

महाराष्ट्र आणि वारीचा संबंध एवढा घनिष्ठ आहे. जणू महाराष्ट्र आणि वारी एकाच नाण्याच्या दोन बाजू. एकीकडं आजच्या युगात भक्तीचाही मोठा ‘इव्हेंट’ होतोय. दर्शन,महादर्शन, महाभिषेक, डोनेशन, पूजा आदींचे एक मार्केटच उभा राहिलेयं. मात्र, पंढरीची वारी आजही त्याला अपवाद. विठ्ठलभक्तीत तल्लीन होण्याचा हा आनंदसोहळा अवर्णनीयच.

भजन, प्रवचन, कीर्तन, रिंगण, धावा, फुगडी, नामस्मरण, टिळा, बुक्का, पावसामुळे निर्माण झालेला मृदगंध आदींच्या साक्षीनं हा सोहळा फुलतो. पंढरीची वारी म्हणजे वारकऱ्यांची दिवाळीच. महिना-तीन आठवडे ऊन, पाऊस, वाऱ्याची तमा न बाळगता पायी शेकडो किमी चालणारा, टाळ-मृदंगाच्या तालावर ज्ञानोबा - तुकारामाचा गजर करणारा वारकरी केवळ विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाच्या दर्शनावर समाधान मानतो.

‘जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता’
अशा कृतार्थ भावनेने पंढरपुरातून माघारी फिरतो. भक्तीचं हे रुप किती सात्त्विक, सुंदर, सहजसाधं. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी व जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून निघते. पैठणहून संत एकनाथ महाराज, त्र्यंबकेश्वरवरून संत निवृत्तिनाथांची, मुक्ताईनगरवरून (जि.जळगाव) संत मुक्ताबाईं, शेगावहून संत गजानन महाराज आदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पालख्या निघतात.

यंदा मात्र पंढरीच्या वारीचा दरवर्षीसारखा सोहळा प्रथमच रंगणार नाही. कोरोना संसर्गामुळे पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला. मात्र, परंपरा अबाधित राखण्यासाठी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत संतांच्या पादुका पंढरपूरला नेल्या जातील. देहूहून संत तुकाराम महाराज आणि आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांनी निवडक  वारकऱ्यांच्यासोबत प्रस्थान केले आहे. त्यामुळे पंरपरा खंडित होणार नसली तरी कीर्तन, प्रवचन, धावा, रिंगण आदींचा दिमाखदार सोहळा नसेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

...कठीण वज्रास भेदू ऐसे
वारकरी म्हटल्यावर भोळाभाबडा, सात्त्विक प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. मात्र,हाच वारकरी वेळप्रसंगी प्रतिकूल परिस्थितीचा खंबीरपणाने सामना करतो. तिच्यावर ‘वार’ करतो. काम, क्रोध, लोभ आदी षड्‌विकारांवर वार करणारा तो वारकरी, अशीही वारकऱ्याची एक व्याख्या केली जाते.

संत तुकाराम महाराज म्हणतात...
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे।

प्रपंचासह परमार्थाच्या वाटेवरील संकटाचाही मोठ्या धैर्यानं सामना करणारा हा विष्णुदास. आज महाराष्ट्रच नव्हे तर देश, जग कोरोना विषाणूच्या साथीच्या अभूतपूर्व संकटाचा सामना करतेयं. प्रत्येक देश लस शोधण्यासाठी जंग जंग पछाडतोयं. मात्र, लस सापडेपर्यंत शारीरिक अंतर, मास्क आदींना पर्याय नाही.  जणू कोरोनारुपी वज्रच आता या विष्णुदासांना भेदावं लागणारं आहे. वारकरी निश्चितच ते भेदतील. आपणही त्यांना साथ देऊयात. कोरोनावर ‘वार’ करणं ही तुमचीआमची सर्वांचीच जबाबदारी.

वारकरी संप्रदायात वारीला विशेष महत्व आहे. वर्षभरात चैत्री, माघी, कार्तिकी आणि आषाढी या चार वाऱ्या महत्त्वाच्या. त्यातही आषाढी वारी सर्वांत महत्त्वाची. ज्यांच्या घरात पंरपरेने वारी आहे, ते सहसा वारी चुकवत नाहीत. आमच्या समस्या कमीजास्त प्रमाणात असणारच आहेत. मात्र, ‘वारी चुक न दे हरी’ अशी त्यांची पांडुरंगाला आळवणी असते.

पंढरीचा वारकरी
 वारी चुकू न दे हरी
चंद्रभागे स्नान, तुका मागे हेचि दान
पंढरीचा वारकरी
वारी चुकु न दे हरी

यंदा मात्र कोरोनानं लाखो वारकऱ्यांना नाईलाजानं वारी चुकवावी लागतेयं. मात्र, खऱ्या वारकऱ्याचं चित्त वारीतचं असेल. प्रत्येक जण मनानं वारी अनुभवेल.

देह जावा अथवा राहो
पांडुरंगी दृढ भाव राहो

यावर्षी वारकरी ‘पंढरीची वारी यंदा चुकू दे हरी...’असचं म्हणत असेल. कोरोनाचं संकट लवकरात लवकर दूर कर, असं साकडही तो विठ्ठलाला घालत असेल. पांडुरंगही त्यांना प्रेमानं समजावून घेईल. पुंडलिकासाठी २८ युगे विटेवर काढणारे हे सावळेसुंदर ध्यान आपल्या सावळ्या भक्तांसाठी एक वर्ष सहजच काढेल.

Wari 2020  वारी 2020

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com