भिलारेवाडी : डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव

भिलारेवाडी : डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव

पुणे शहराच्या दक्षिणेस डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव अशी भिलारेवाडीची ओळख. शहरालगत असूनही गावाचे गावपण अद्याप टिकून आहे. गावातील अडचणींसाठी ग्रामपंचायतीकडे तत्काळ दाद मागता येत होती, परंतु गावाच्या समावेशानंतर गावातील समस्या सोडविण्यासाठी कोणासमोर प्रश्न मांडणार आणि प्रश्न मांडण्यासाठी महापालिकेचे अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी सहज उपलब्ध होऊ शकतील का ? हा येथील ग्रामस्थांसमोरील प्रश्न आहे. त्यामुळे महापालिकेतील समावेशामुळे गावकऱ्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे.

भौगोलिकदृष्ट्या डोंगरउतारावर गाव असून गावालगत कात्रज घाट आणि डोंगररांगा असल्याने बिबट्या नजरेस पडण्याच्या घटनाही वरच्या वर घडत असतात.

२००२ मध्ये स्वतंत्र ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली आहेत. गावातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे असून, पाझर तलावाखालील विहिरीतून गावाला पाणीपुरवठा होतो. महापालिका समावेशाआधीच महापालिकेने गावात १० कोटी रुपयांची सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम केले आहे. हे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर असले तरी वाहिनीची जोडणी न केल्याने मैलायुक्त पाणी ओढ्यात सोडले जात आहे. गावात कचऱ्याची प्रमुख समस्या असून गाव पुणे- बंगळूर महामार्गाला लागून असल्याने महापालिका हद्दीतील हॉटेलचालक रात्रीच्यावेळी कचरा रस्त्याच्या कडेला आणून टाकत असल्याचे दिसते. त्याचबरोबर, शहरातील काही नागरिक बाहेर पडताना कचरा रस्त्याच्या कडेला फेकतात, याचा नाहक त्रास गावातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

गावात सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा करण्यावर भर दिलेला आहे, मात्र कचऱ्याची समस्या भेडसावत असून महापालिकेतील समावेशानंतर ती सुटावी. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यात आम्ही यशस्वी होत आहोत, परंतु महापालिका समावेशानंतर भ्रमनिरास होऊ नये ही अपेक्षा आहे. 
- ताराचंद उघडे, सरपंच

ग्रामस्थ म्हणतात...
विक्रम भिलारे (उपसरपंच) -
आमच्या आधी महापालिकेत ११ गावांचा समावेश झाला होता. त्यांचा विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे आमच्या गावाचा समावेश झाल्यावर विकास होईल का? हा प्रश्न आहे, तसेच नवीन गावांसाठी तयार होत असलेल्या विकास आराखड्याविषयी सर्वांना माहिती देणे आवश्‍यक आहे

सुहास सावंत (युवक) - केवळ राजकारण म्हणून आमच्या गावाचा महापालिकेत समावेश व्हायला नको. महापालिकेत गेल्यास आणखी मोठ्या प्रमाणावर विकास व्हावा, अशी अपेक्षा आहे.

भीमराव भिलारे (शेतकरी) - गावाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर वन विभागाची जमीन असून, वाढत्या शहरीकरणामुळे आणि डोंगरभागामुळे शेती करणेही कठीण झाले आहे. 

दृष्टिक्षेपात गाव...
लोकसंख्या - २५९४  (२०११ च्या  जनगणनेनुसार)
क्षेत्रफळ - ३१८ हेक्‍टर
 सरपंच - ताराचंद उघडे
 सदस्य संख्या - दहा

पुणे स्टेशनपासून अंतर -  १४ किलोमीटर
गावाचे वेगळेपण - गावात पाझर तलाव आणि विठ्ठल-रुक्‍मिणीचे सुंदर मंदिर
 

(उद्याच्या अंकात वाचा  गुजर निंबाळकरवाडी​ गावाचा लेखाजोखा.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com