

पुणे : भारताची प्राचीन कला म्हणून ओळख असलेली वामन वृक्ष कला आणि नंतर बाहेरील देशात नावारूपास आलेल्या 'बोन्साय' या कलेमध्ये पुण्यातील प्राजक्ता काळे यांनी एक नवा आयाम रचला आहे. पुण्यातील बोन्साय मास्टर असलेल्या प्राजक्ता काळे आता बोन्सायमध्ये डॉक्टरेट मिळविणाऱ्या जगातील पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.
फ्रान्समधील पॅरीस येथील युरोपियन आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून प्राजक्ता काळे यांना नुकतीच डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. मलेशियामध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात काळे यांनी स्वत: ही पदवी स्वीकारली.
या वेळी युरोपीयन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे (ईआययू) जागतिक प्रवर्तक डॉ. अजय देसाई, ईआययूचे आंतरराष्ट्रीय सल्लागार डॉ. परमेश्वरन, विद्यापीठाचे विश्वस्त रॉबर्ट ब्रँड, ईआययूच्या असील ऐतबायेवा, ईआययूचे महासंचालक डॉ. एडवर्ड रॉय क्रृष्णन, उद्योजक गिरीधर काळे आदि उपस्थित होते.
मागील ३५ वर्षांपासून आपला छंद म्हणून बोन्साय कला जोपासणाऱ्या प्राजक्ता काळे यांनी या वेळी युरोपियन विद्यापीठाचे आभार मानले. या प्रसंगी बोलताना काळे म्हणाल्या, “युरोपियन आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून ही डॉक्टरेटची पदवी स्वीकारताना मला आनंद होत आहे. याबरोबरच या कलेच्या वाढीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी माझ्यावर पडली असल्याची मला जाणीव आहे. आज इंडोनेशिया, तैवान, चीन, जपान, बेल्जियम, इटली अशा अनेक देशांमध्ये बोन्सायकडे केवळ एक कला म्हणून न पाहता एक व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे.
मात्र भारतात अशी परिस्थिती नाही. त्यामुळे एक व्यवसाय निर्मिती करणारे क्षेत्र म्हणून त्याचा विकास व्हावा या उद्देशाने मी गेली अनेक वर्ष काम करीत आहेत. याद्वारे महिला व युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच भारतात रोजगाराच्या आणखी संधी यातून कशा निर्माण होऊ शकतील यासाठी मी प्रयत्न करीत आहे. हे करीत असताना शासनाने याकडे रोजगार निर्मिती करणारी चळवळ म्हणून पाहात प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे मला वाटते.”
याच दिशेने एक पाऊल म्हणून मी स्वत: बोन्साय या विषयाचा एक अभ्यासक्रम सुरू केला असून याद्वारे ही कला व रोजगाराची संधी येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मी योजना तयार केली आहे. याद्वारे तरुण पिढी बोन्साय या विषयाकडे लक्ष देत स्वावलंबनाने स्वत:चा विकास करू शकेल, असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.
गेले ३५ वर्षे बोन्साय एक छंद म्हणून जोपासणाऱ्या प्राजक्ता काळे या बोन्साय मास्टर म्हणून ओळखल्या जातात. एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वात मोठा संग्रह असलेला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही त्यांच्या नावे आहे. त्यांच्या या संग्रहामध्ये देशविदेशातील अनेक बोन्साय वृक्षांच्या प्रजातींचा समावेश आहे.
प्राजक्ता काळे यांच्या संकल्पनेतून २२ फेबृवारी ते २५ फेब्रुवारी, २०१८ या कालावधीत ‘बोन्साय नमस्ते’ या भारतातील पहिल्या व जगातील सर्वांत मोठ्या बोन्सायच्या आंतरराष्ट्रीत परिषद व प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आले होते. या प्रदर्शनात हजारो प्रकारचे बोन्साय पाहण्याची संधी बोन्साय प्रेमींना मिळाली होती. या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल काळे यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.