Coronavirus : कैद्यांची सुटका होणार? कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी 'ऍक्‍शन प्लॅन'!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 मार्च 2020

कारागृहाचे गेटवर कैद्यांना भेटण्यास येणारे कुटुंबीय, नातेवाईक यांना पुढील 15 दिवस भेट रद्द केली आहे.

पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर आता राज्यातील 60 कारागृहांमध्ये असलेल्या कच्चे कैद्यांना तात्पुरता जामीन देऊन त्यांना घरी पाठविण्याचा प्रस्ताव न्यायालयात देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तसेच पुढील 15 दिवस कैद्यांना न्यायालयात हजर करण्याऐवजी कैद्यांबाबतचे न्यायालयीन काम 100 टक्के व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे केले जाणार असल्याचेही रामानंद यांनी स्पष्ट केले. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव व संसर्ग वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारी पातळीवर ठोस प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर रामानंद यांनी कारागृहातील कैद्यांबाबत घेतल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

- न्यायालयाच्या वेळेतही बदल, अतितात्काळ खटलेच चालणार

रामानंद म्हणाले, ''राज्यात सध्या 45 ठिकाणी एकूण 60 कारागृह असून त्यांची क्षमता 24 हजार कैद्यांची आहे. मात्र या कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे सध्या 38 हजार कैदी आहेत. त्यातील साडेआठ हजार कैद्यांना शिक्षा सुनावलेली आहे, तर उर्वरीत कैद्यांची न्यायालयीन सुनावणी अद्याप सुरु आहे. त्यामुळे कारागृहावर अतिरिक्त ताण पडत आहे. या कारणामुळे कारागृहातील कच्चे कैद्यांची संख्या कमी करण्याची आवश्‍यकता आहे. त्यादृष्टीने छोट्या व मध्यम गुन्ह्यातील कैद्यांना तात्पुरता जामीन देऊन त्यांना घरी पाठविण्याबाबतचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला आहे.'' 

- Coronavirus : कोरोनाग्रस्त पेशंटना दिला जातोय 'हा' स्पेशल मेन्यू!

कारागृह व न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे सुनावणी 

राज्यातील कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी कारागृहात आहे. कैद्यांची गर्दी कमी करणे आवश्‍यक आहे. पुण्यातील येरवडा कारागृह, मुंबईतील आर्थर रोड कारागृह, नाशिक कारागृह, ठाणे कारागृह या चार ठिकाणी एकूण कैद्यांच्या 40 ते 45 टक्के कैदी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहातील कैद्यांची आवक-जावक कमी करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने न्यायालयीन सुनावणी, जामीन यासाठी न्यायालयात जाणाऱ्या कैद्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे पुढील 15 दिवस सुनावणी केली जाणार आहे. कैद्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्यास बंदी घालण्यात येईल, असे रामानंद यांनी स्पष्ट केले. 

- Corona Virus : पुण्यात आणखी एक रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या पोहचली...

कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी 'ऍक्‍शन प्लॅन' 

कारागृहात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची प्रवेशद्वाराबाहेरच वैद्यकीय तपासणी केली जाईल, त्यानंतर त्यांना कारागृहामध्ये सोडले जाईल. बुधवारपासून राज्यातील सर्व कारागृहामधील कैद्यांच्या वैद्यकीय तपासणीला सुरूवात होईल. कैद्यांमध्ये रोगाची लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर त्वरीत औषधोपचार केले जातील. तसेच कारागृहात विलगीकरण कक्षाची तयार केला आहे. संशयित रोगग्रस्त कैद्यांची संख्या वाढली तर त्याकरिता 'ऍक्‍शन प्लॅन' तयार केला आहे. कारागृहाचे पाच हजार कर्मचाऱ्यांमध्ये रोगाची लक्षणे दिसल्यास त्यांचेकरिता ही विलगीकरण कक्षांची निर्मिती केली असल्याचे त्यांनी सांगितले. 

- Corona Effect : रेल्वेने घेतली कोरोनाची धास्ती; 'या' 23 रेल्वेगाड्या रद्द!

पुढील 15 दिवस कैद्यांची भेट रद्द 

कारागृहाचे गेटवर कैद्यांना भेटण्यास येणारे कुटुंबीय, नातेवाईक यांना पुढील 15 दिवस भेट रद्द केली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्स, कॉईन बॉक्‍स याद्वारे संबंधित कैद्यांशी त्यांना संर्पक साधता येईल. कैद्यांना दिल्या जाणाऱ्या आहारात प्रतिकार क्षमता वाढावी यादृष्टीने आवश्‍यक बदल केले जात असल्याचे रामानंद यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: proposal filed in court for temporary bail to the row prisoners to avoid Corona says DGP Ramanand