
संबंधीत तरुणांकडून आणखी काही नागरीकांना याच पद्धतीने खंडणी मागितल्याची शक्यता आहे, त्यामुळे अशा नागरीकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले.
पुणे : जीवे मारण्यासाठी 50 लाखांची सुपारी घेतल्याची धमकी देऊन जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटाकडून 20 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या तरुणासह त्याच्या साथीदाराला अंमली पदार्थ आणि खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी (ता.२०) दुपारी कोंढवा परिसरामध्ये करण्यात आली.
सागर दत्तात्रय फडतरे (वय 29, रा. बोपगाव, पुरंदर), गणेश दत्तात्रय फडतरे (वय 29, रा. बोपगाव, पुरंदर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा येथील एका जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटाने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दिली होती.
- पुणे जिल्ह्यात लॉकडाउन? सोशल मीडियातील व्हायरल व्हिडिओवर जिल्हाधिकाऱ्यांच स्पष्टीकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा कोंढवा परिसरामध्ये जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यास काही दिवसांपुर्वी एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्यावेळी "तुमची 50 लाखांची सुपारी मिळाली असून जीव वाचवायचा असेल, तर 20 लाख रुपये द्या' अशी मागणी केली. त्यानंतरही आरोपीने तक्रारदाराला सातत्याने फोन करून त्यांच्याकडे खंडणीसाठी तगादा लावला. या प्रकारामुळे व्यावसायिकाने थेट पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे (पूर्व विभाग) याबाबत तक्रार केली.
- भाजप पदाधिकाऱ्यासह ८ जणांना अटक; गुंड गजा मारणेच्या मिरवणुकीसाठी पुरवली होती आलिशान गाडी
पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन शुक्रवारी कोंढवा परिसरातील तक्रारदाराच्या कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदाराने सांगितल्यानुसार, आरोपी 20 लाख रुपयांची खंडणी घेण्यासाठी तक्रारदाराच्या कार्यालयात आला. त्याने तक्रारदाराकडून 20 लाखांची खंडणी घेतली. त्याचवेळी परिसरात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याचा मित्र गणेश फडतरे हा देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्यालाही अटक केली.
- सदाशिव पेठेतील खानावळ सील; कोरोनाचे नियम न पाळल्याने पुणे महापालिकेचा दणका
संबंधीत तरुणांकडून आणखी काही नागरीकांना याच पद्धतीने खंडणी मागितल्याची शक्यता आहे, त्यामुळे अशा नागरीकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले. अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)