पुणे : बेशिस्त वाहनचालकांनो, आता तुमच्या खिशाला लागणार कात्री

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 December 2020

2019 पासून अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त हायड्रॉलिक टोईंग क्रेनच्या सहाय्याने संबंधित वाहने उचलून नेऊन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सध्या विदर्भ इन्फोटेक ही कंपनी कंत्राटी पद्धतीने वाहने उचलण्याचे काम करीत आहेत. 

पुणे : वाहतुकीला अडथळा होत असूनही बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्या वाहनचालकांना आता दंडाच्या रकमेमध्ये जादा टोईंग शुल्क भरावा लागणार आहे. रस्त्यांवर बेशिस्तपणे लावलेली वाहने हायड्रॉलिक क्रेनच्या सहाय्याने नेणाऱ्या टोईंग कंपनीने त्यांच्या शुल्कामध्ये दहा टक्‍क्‍यांची वाढ केली. त्यामुळे कारवाई झालेल्या दुचाकीला 20 रुपये, तर चारचाकी वाहनांना 40 रुपये भरावे लागणार आहेत. 

कुस्तीपटू राहुल आवारे बनले DySP; पुणे ग्रामीण पोलिस दलात होणार रुजू​

नागरिकांकडून नो पार्किंग, आखून दिलेल्या पट्ट्याच्या बाहेर वाहने लावणे किंवा सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावण्याचे प्रकार केले जातात. त्याचबरोबर अनेकदा वाहतुकीला अडथळा ठरतील, अशा पद्धतीने वाहने लावली जात असल्याचे प्रकार घडतात. या पार्श्‍वभूमीवर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून पूर्वी टेम्पोतून वाहने उचलून नेली जात होती, त्यामध्ये वाहनांचे नुकसान होत असल्याने पोलिस आणि नागरिकांमध्ये सातत्याने वादाच्या घटना घडत होत्या. त्यामुळे 2019 पासून अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त हायड्रॉलिक टोईंग क्रेनच्या सहाय्याने संबंधित वाहने उचलून नेऊन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सध्या विदर्भ इन्फोटेक ही कंपनी कंत्राटी पद्धतीने वाहने उचलण्याचे काम करीत आहेत. 

चारित्र्यावर संशय घेत पती करायचा मारहाण; डॉक्‍टर महिलेनं संपवलं जीवन​

संबंधित कंपनीकडून टोईंग शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. नो-पार्किंगमध्ये दुचाकी किंवा चारचाकी वाहन लावल्यास वाहतूक पोलिसांकडून 200 रुपये दंड आकारला जातो. त्यानुसार दंडाचे 200 रुपये, दुचाकी टोइंगसाठी 200 रुपये व 36 रुपये वस्तू आणि सेवा (जीएसटी) असे मिळून 436 रुपयांचा दंड यापूर्वी आकारला जात होता. आता दुचाकी टोईंगसाठी 20 रुपयांची, तर चारचाकी टोईंगसाठी 40 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

मराठा क्रांती मोर्चाची 'महावितरण' कार्यालयावर धडक; भरती प्रक्रिया उधळली​

परिणामी रक्कम वाढल्याने जीएसटीतही वाढ झाली आहे. त्यामुळे आता दुचाकीसाठी प्रत्येकी 220 रुपये टोइंग, 200 रुपये दंड आणि 40 रुपये जीएसटी असे 460 रुपये भरावे लागणार आहेत. चारचाकी वाहनांसाठी 440 रुपये टोइंग, 200 रुपये दंड आणि 80 रुपये जीएसटी असे एकूण 720 रुपये आकारण्यात येत आहेत. 

"वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणारी वाहने उचलून नेणाऱ्या कंत्राटदार टोईंग क्रेन कंपनीने सरकारसमवेत 2019 मध्ये करार केला होता. संबंधीत करारानुसार, त्यांनी टोईंगच्या शुल्कामध्ये वार्षिक 10 टक्के वाढ केली आहे.''
- राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune citizens who drive recklessly will have to pay extra towing charges in addition to fine