अज्ञात आजाराने २०० कोंबड्या दगावल्या; पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला अलर्ट

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

सतर्क क्षेत्राच्या ठिकाणी पक्षी, अंडी, कोंबडी खत, पक्षी खाद्य आणि अनुषंगिक साहित्य, उपकरणे आदींची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.

नारायणगाव (पुणे) : येडगाव (ता.जुन्नर) येथील गणेशनगर शिवारातील देशी कुक्कुटपालन फार्ममधील दोनशे कोंबड्या अज्ञात आजाराने मृत दगावल्या आहेत. बर्ड फ्लूच्या संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचा रोग निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत येडगाव शिवारातील दहा किलोमीटरपर्यंतचा परिसर रविवारीपासून सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे, असा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे. याबाबतची माहिती तहसिलदार हनुमंत कोळेकर, जुन्नर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एम.ए. शेजाळ यांनी दिली.

शशिकांत शिंदे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले पाहा​

याबाबत डॉ. शेजाळ म्हणाले गणेशनगर येथील देशी कुक्कुटपालन फार्ममध्ये दोन हजार देशी कोंबड्या पैकी सुमारे दोनशे कोंबड्या अज्ञात आजाराने मृत झाल्या आहेत. सध्या राज्यात बर्ड फ्लूच्या संसर्गाची स्थिती असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मृत कोंबड्यांचे नमुने भोपळा येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोगनिदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवाल बुधवार (ता.२७) पर्यंत प्राप्त होईल. रोग निदान अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कोंबड्यांच्या मृत्युचे निदान होईल.

पुण्यात १३ तृतीयपंथीयांना अटक; सिग्नलवर वाहनचालकांना धमकावून उकळायचे पैसे​

दरम्यान अज्ञात रोगाचा प्रसार तालुक्यात आणि जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता असल्याचे गृहीत धरुन प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार जिल्हाधिकारी डॉ.  देशमुख यांनी आदेश दिला आहे. त्यानुसार येडगाव शिवारातील दहा किलोमीटर पर्यंतचा परिसरात रविवारपासून सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

यामुळे सतर्क क्षेत्राच्या ठिकाणी पक्षी, अंडी, कोंबडी खत, पक्षी खाद्य आणि अनुषंगिक साहित्य, उपकरणे आदींची वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे. सतर्क क्षेत्रातील मृत कोंबड्याचा रोग निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत पक्षांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार आदी बाबी बंद ठेवण्यात आले आहेत. सतर्क क्षेत्रातील पोल्ट्री परिसरात नागरिकांच्या हालचालीस आणि इतर प्राण्यांची वाहतूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

शेतकरी आंदोलनावर रामदास आठवले बोलले; शरद पवारांना केली विनंती​

नागरिक व व्यावसायिकांनी घाबरून न जाता या भागातील कुक्कुट शेडचे व अन्य पाळीव प्राणी यांचे गोठयांचे प्रवेशद्वार व परिसराचे निर्जंतुकिकरण करावे.
- डॉ. एम. ए. शेजाळ (पशुधन विकास अधिकारी,जुन्नर पंचायत समिती)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune collector declared alert at Yedgaon afetr 200 hens die due to unknown disease