esakal | पुणे: सीमा भिंतीसाठी ५० कोटींचा खर्च
sakal

बोलून बातमी शोधा

pune corporation file photo

पुणे: सीमा भिंतीसाठी ५० कोटींचा खर्च

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या समान पाणी वाटप योजनेचे काम संथ गतीने सुरू असून त्याचा खर्चही वाढत आहे. या योजनेच्या आराखड्यात पाण्याच्या टाक्या ज्या ठिकाणी दर्शविलेल्या होत्या, त्या ऐवजी इतरत्र त्यांचे बांधकाम करावे लागले आहे. त्यामुळे आता या टाक्यांच्या भोवती सीमाभिंत बांधण्यासाठी महापालिकेला सुमारे ५० कोटी रुपयांचा भूर्दंड बसणार आहे.

हेही वाचा: न्यायालय इमारतीमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडेल- दत्तात्रय भरणे

समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत शहरात ८२ टाक्‍या बांधल्या जाणार आहेत. त्यापैकी सुमारे ३२ टाक्यांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ठिकाणी काम सुरू आहे. मात्र, काही ठिकाणी अद्याप बांधकाम सुरू झाले नाही. शहरात उपलब्ध असलेल्या अॅमेनिटी स्पेसच्या (सुविधा क्षेत्र) जागेवर या टाक्या बांधल्या जाणार होत्या.

त्यासाठी प्रत्येकी किमान ३० गुंठे जागेची आवश्‍यकता असते. ज्या वेळेला अॅमेनिटी स्पेस महापालिकेच्या ताब्यात येतात, तेव्हा संबंधित बांधकाम व्यावसायिक त्यास सीमा भिंत बांधून व गेट बसवून महापालिकेच्या ताब्यात देतो. त्यामुळे त्याचा खर्च महापालिकेला करावा लागणार नव्हता.

हेही वाचा: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी

अॅमेनिटी स्पेसच्या जागेवर टाक्यांचे बांधकाम करण्यास काही स्थानिक नगरसेवक, नागरिकांनी विरोध केला आहे. टाकी बांधली, तर आमच्यासाठी उद्याने व इतर सुविधा मिळणार नाहीत, असे या नागरिकांचे म्हणणे आहे.

त्यामुळे महापालिकेला सुमारे ५२ टाक्यांसाठी नव्याने जागा शोधाव्या लागल्या आहेत. या टाक्यांचे काम पूर्ण होत असताना सुरक्षेच्या कारणास्तव या जागेला सीमा भिंत बांधणे व गेट बसविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सरासरी ८० लाख ते १ कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो. पुढील काळात यासाठी निविदा काढावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

योजनेचा खर्च वाढताच

यापूर्वी सल्लागाराने अर्धवट अहवाल दिल्याने जलवाहिन्यांचा खर्च ५२ कोटी रुपयांनी वाढला असून, त्यासाठी निविदा मागवली आहे. तसेच या योजनेचा सल्लागार पळून गेल्याने आता नव्याने सल्लागार नेमावा लागणार असल्याने खर्चात आणखी वाढ होणार आहे.

loading image
go to top