स्वातंत्र्यानंतरचा शोध ठरला जागतिक 'माईलस्टोन'; देशातील तिसरे मानांकन GMRTला!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

आईईईने जगभरातील 212 अद्भुत रचनांना (माईलस्टोन्स) वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी योगदानासाठी मान्यता दिली आहे. जीएमआरटी हा भारतातील तिसरा माईलस्टोन ठरला आहे.

पुणे : स्वातंत्र्यानंतर विकसित करण्यात आलेल्या रचनेला प्रथमच वैज्ञानिक क्षेत्रातील 'आयईईई' मानांकन प्राप्त झाले आहे. पुण्यातील नारायणगाव जवळील जायंट मिटरवेव रेडिओ टेलिस्कोपला (जीएमआरटीला) 'आईईई माईलस्टोन' म्हणून मान्यता मिळाली आहे. देशाला आजवर मिळालेले हे तिसरे मानांकन असून ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे देशभरातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. 

जगातील सर्वच क्षेत्रातील अद्वितीय तांत्रिक कामगिरीचा सन्मान 'द इंस्टिट्यूट ऑफ इलेक्‍ट्रिकल ऍन्ड इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअर्स' (आयईईई) च्या वतीने करण्यात येतो. भारतात आजपर्यंत 1895 मधील जे.सी.बोस यांच्या रेडिओ लहरींसंबंधीच्या संशोधनाला आणि 1928 च्या रामन यांच्या संशोधनाला हे मानांकन प्राप्त झाले होते.

इंजिनिअरींगसह सर्व अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार

आईईई इंडिया ऑपरेशनचे वरिष्ठ संचालक हरीश मैसूर म्हणाले, ''आईईईने जगभरातील 212 अद्भुत रचनांना (माईलस्टोन्स) वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी योगदानासाठी मान्यता दिली आहे. जीएमआरटी हा भारतातील तिसरा माईलस्टोन ठरला आहे. देशातील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या अतुलनीय योगदानाचे हे द्योतक असून तरून प्रतिभेला मूलभूत विज्ञान आणि अभियांत्रिकीकडे आकर्षित करण्यास हे मानांकन मदतही करेल.'' जीएमआरटीची संकल्पना देशातील रेडिओखगोलशास्त्राचे जनक दिवंगत प्रा. गोविंद स्वरूप यांनी मांडली होती. आयईईईचे हे मानांकन संस्थेच्या यशाचा मुकुटमनी ठरले आहे, अशी प्रतिक्रिया एनसीआरएचे निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. एस. अनंतकृष्णन यांनी दिली. टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राच्या अंतर्गत जीएमआरटी या रेडिओ दुर्बिणीचे कार्यान्वयन करण्यात येते. 

पुणे विद्यापीठ : परीक्षा विभागात विद्यार्थ्यांला बेदम मारहाण​

काय आहे प्रशस्तिपत्र : 
''जीएमआरटीही नवीन दुर्बिणीची रचना, संग्रहाची यंत्रणा आणि ऑप्टिकल फायबर संदेश वहन क्षेत्रातील आद्यप्रवर्तक आहे. ब्रह्मांडाला समजून घेण्यासाठी जीएमआरटीने पल्सार, महाविस्फोट (सुपरनोव्हा), आकाशगंगा, क्वासार आणि विश्‍वविज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.''

जीएमआरटीची भव्यता... 
- विस्तार : 30 किलोमीटर 
- एका अँटीनाचा व्यास : 45 मीटर 
- अँटीनांची संख्या : 30 
- या दरम्यानच्या रेडिओ लहरीं संग्रहित करते : 110 ते 1460 मेगाहर्टझ 
- कार्यान्वयन : 1990 
- आजवरचे वापरकर्ते देश : 40 हून अधिक

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ऑनलाइन रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ​

पूर्णपणे स्वदेशी अत्याधुनिक सुविधेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणे देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे. दिवंगत प्रा. गोविंद स्वरूप यांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल 
- प्रा.यशवंत गुप्ता, संचालक, एनसीआरए. 

जे.सी.बोस आणि सी.व्ही.रामन यांच्या शंभर वर्षांपूर्वीच्या विशेष कार्यानंतर जीएमआरटीला हे मानांकन मिळाले आहे. ही एक अद्भुत बातमी आहे. एनसीआरए आणि टिआयएफआरच्या भूतकाळातील आणि वर्तमानातील शास्त्रज्ञांचा आम्हाला अभिमान वाटतो. 
- डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ वैज्ञानिक आणि फेलो ऑफ रॉयल सोसायटी 

विज्ञान आणि तंत्रज्ञानात संपूर्ण विश्‍वासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या अतुलनीय रचनांना आयईईई माईलस्टोन म्हणून गौरविण्यात येते. रेडिओ खगोलशास्त्राच्या माध्यमातून विश्‍वाचा शोध घेणाऱ्या संशोधनात जीएमआरटीचे अतुलनीय योगदान आहे. 
- प्रा. तोशिओ फुकुडा, अध्यक्ष, आयईईई

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune GMRT becomes Indias third IEEE milestone facility