Pune : कॉंक्रीटच्या रस्त्यावरुन तिसऱ्याच दिवशी वाहतूक सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : कॉंक्रीटच्या रस्त्यावरुन तिसऱ्याच दिवशी वाहतूक सुरू

Pune : कॉंक्रीटच्या रस्त्यावरुन तिसऱ्याच दिवशी वाहतूक सुरू

किरकटवाडी : नव्याने कॉंक्रीटीकरण करण्यात आलेल्या किरकटवाडी फाट्याजवळील रस्त्यावरुन तिसऱ्याच दिवशी वाहतूक सुरू करण्यात आल्याने रस्ता खराब होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. वाहतुकीचे कोणतेही नियोजन न करता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम करण्यात येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत असा आरोपही नागरिकांनी केला आहे.

हेही वाचा: हर्बल हुक्क्याला दिल्लीत परवानगी; वाचा काय म्हणालं हायकोर्ट?

किरकटवाडी फाट्याजवळ मुख्य सिंहगड रस्त्याचे शनिवारी मध्यरात्री कॉंक्रीटीकरण करण्यात आले. सदर ठिकाणी कॉंक्रीटीकरण करताना संभाव्य वाहतूक कोंडीचा कोणताही विचार करण्यात आला नाही. शिवाय पर्यायी रस्त्याबाबत कसलेही नियोजन करण्यात आले नाही. परिणामी रविवारी (दि.14) पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांची वाहने व स्थानिक नागरिकांची वाहने यामुळे दिवसभर किरकटवाडी फाट्यावर वाहतूक कोंडी झाली. हेच चित्र सोमवारी (दि.15) रोजीही दिसून आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पाहणी केली व दुचाकी वाहनांसाठी नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले, प्रत्यक्षात मात्र दुचाकींसह अवजड वाहनेही अद्याप तीन दिवसही पूर्ण न झालेल्या रस्त्यावरुन जाऊ लागल्याने अशाने रस्ता किती दिवस टिकणार?असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा: प्रज्ञा सातव यांचा विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

"थोडे दिवस ये-जा करताना त्रास झाला असता. तिसऱ्याच दिवशी जर वाहतूक सुरू करण्यात येत असेल तर काय उपयोग होणार? वाहतुकीचे नियोजन काम करण्याच्या अगोदर व्हायला हवे होते. लॉकडाऊन दरम्यान एक वाहन रस्त्यावर फीरकत नव्हते तेव्हाच हे काम व्हायला हवे होते."

- कालिदास चावट, स्थानिक नागरिक, किरकटवाडी.

"सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्याचे काम झाल्यानंतर किमान दहा दिवस दररोज दोन वेळा पाणी मारुन क्युरिंग व्हायलाच हवे. लगेच वाहतूक सुरू झाल्याने कॉंक्रीटला मजबुती येणार नाही व परिणामी रस्ता लवकर खराब होईल."

- नरेंद्र हगवणे, आर्किटेक्ट, किरकटवाडी.

"वाहतूक कोंडी होत असल्याने केवळ दुचाकी वाहने नवीन रस्त्यावरुन जातील अशी व्यवस्था करण्याचे सांगितले होते. मोठी वाहने जात असतील तर त्यांना थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येईल."

- ज्ञानेश्वर राठोड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.

loading image
go to top