Pune Market Yard : पार्कींग शुल्क ठेका अखेर रद्द; वार्षिक शुल्क घेण्याचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Market Yard

पार्कींग शुल्क ठेका अखेर रद्द; वार्षिक शुल्क घेण्याचा निर्णय

मार्केट यार्ड : फळे, भाजीपाला बाजारात खरेदीदार वाहनांकडून पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला होता. परंतु बाजारातील विविध संघटनांचा विरोध लक्षात घेऊन समितीने हा ठेका रद्द करून नाममात्र दरात वार्षिक शुल्क घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे बाजारातील सर्व संघटनांनी रविवारपासून पुकारलेला बंद मागे घेण्यात आल्याचे जाहीर केले.

हेही वाचा: कुलभूषण जाधव यांना दाद मागता येणार, पाकिस्तानी संसदेत विधेयक मंजूर

पार्कींग शुल्क आकारणीचा तोडगा काढण्यासाठी बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या अध्यक्षतेखाली बाजारातील सर्व संघटनांची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत पार्कींग शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करून नाममात्र दरात वार्षिक शुल्क घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. यावेळी अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, राजेंद्र कोरपे, बापू भोसले, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, राजेंद्र रेणूसे, विशाल केकाणे आदी उपस्थित होते.

अडते असोसिएशनच्या विनंतीला मान देऊन सदर पार्किंग शुल्क न घेण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला असल्याचे अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. बाजार समितीने सुरू केलेले पार्किंग शुल्क बाजार समितीने रद्द केल्याचे आज जाहीर केले. चर्चेअंती नाममात्र प्रवेश शुल्क घेण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 8.00 वाजता गणपती मंदिर येथे खरेदीदार आणि टेम्पो चालक यांची बैठक होणार आहे. यामध्ये किती प्रवेशशुल्क द्यायचा हे ठरेल. तसा प्रस्ताव बाजार समितीला देण्यात येईल. असे टेम्पो संघटना आणि कामगार युनियनच्या वतीने संतोष नांगरे यांनी सांगितले.

हेही वाचा: पाकिस्तानच्या मोहम्मद जिनांची 'संपत्ती' शोधून काढणार 'न्यायालय'

तीन चाकी वाहनांना भराई, वाराई नाही

बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या तीन चाकी टेम्पोचालकांकडून यापुढे कोणतीही वाराई आणि भराईचे शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच याबाबत एक समिती नेमली जाणार आहे. काम न करता कोणी पार्कींग शुल्क, वाराई आणि भराई घेत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही गरड यांनी सांगितले.

"बाजार समितीने ठेकेदारामार्फत घेतले जाणारे पार्कींग शुल्क बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी सर्व खरेदीदार टेम्पोधारकांकडुन नाममात्र दरात वार्षिक वाहनतळ सुविधा शुल्क एकरकमी आकरणेबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, खरेदीदार टेम्पोचालकांच्या सोयीनुसार बाजार समितीचे कर्मचारी त्यांना वाहने लावण्यास जागा उपलब्ध करून देऊन कोणी टेम्पो चालकाकडून शुल्क आकारणी केल्यास त्याच्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल."

- मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

बाजारात चारचाकी आणि सहाचाकी वाहनांमध्ये शेतीमाल लावण्यासाठी लेव्हीसह ५ ते १५ किलो पर्यंत रक्क २ रुपये, १६ ते ३० किलोपर्यंत रक्कम ३ रुपये, तसेच ३१ किलोच्या पुढील रक्कमेस ५ रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

loading image
go to top