Pune: वैद्यकीय महाविद्यालयाबाबत साशंकता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैद्यकीय

पुणे : वैद्यकीय महाविद्यालयाबाबत साशंकता

पुणे : पुणे महापालिकेने यंदापासून स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा चंग बांधला असला तरी महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या वर्गखोल्यांची रचना, पायाभूत सुविधा, दुसऱ्या वर्षाची वर्ग भरण्यासाठी इमारत याची पूर्तता झालेली नसल्याने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (नॅशनल मेडिकल कौन्सिल) आक्षेप घेतले आहे. त्यामुळे यंदापासून महाविद्यालय सुरू करण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

पुणे महापालिकेने भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे प्रस्ताव देखील पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव गेल्यानंतर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने महाविद्यालय सुरू करण्यासाठी महापालिकेला निकषांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले होते. महापालिकेने वैद्यकीय महाविद्यालयासाठी बाबूराव सणस शाळेत वर्ग भरविण्यात येणार आहेत. तर कमला नेहरू रुग्णालयाशी हे वर्ग संलग्न असणार आहेत. तर सारसबाग येथील सणस क्रीडांगण येथे विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची सुविधा असणार आहे. हे महाविद्यालय यंदापासून सुरू होईल. नीटच्या माध्यमातून प्रथम वर्षाच्या १०० जागा भरल्या जातील असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे.

हेही वाचा: Video: बोल्टची 'स्मार्ट' गोलंदाजी... वॉर्नरचा उडवला त्रिफळा!

दरम्यान, महापालिकेला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे पत्र प्राप्त झाले आहे. यामध्ये शाळेचे रूपांतर वैद्यकीय महाविद्यालयात केले जात आहे. यामध्ये वर्गखोल्या लहान असून, विद्यार्थ्यांची बसण्याची योग्य पद्धतीने सोय होणार नाही. या ठिकाणच्या आसन व्यवस्थेत बदल केला तरी ऑडिओ व्हिजवल क्लास घेताना विद्यार्थ्यांना आवाज व्यवस्थित पोचणार नाही अशा त्रुटी यात काढण्यात आलेल्या आहेत. तसेच वैद्यकीय शिक्षणासाठी पुस्तकांची संख्या खूपच कमी आहे, ती वाढविणे गरजेची आहे असेही या पत्रात नमूद केले आहे.

पुणे महापालिकेने वैद्यकीय महाविद्यालयाची प्रस्तावित इमारत नायडू रुग्णालयाच्या आवारात असेल त्यासाठी नवीन बांधकाम सुरू केले आहे असे प्रस्तावात नमूद केले होते. मात्र, अद्याप या ठिकाणी बांधकाम सुरू झालेले नाही. यावर आयोगाने आक्षेप घेत दुसऱ्या वर्षासाठी वर्ग कुठे भरणार, त्याची व्यवस्था झाल्याशिवाय परवागनी देता येणार नाही असे पत्र पाठविले असल्याने महापालिकेचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता महापालिकेने गेल्या १०० वर्षापेक्षा जास्त वर्षापासून सेवेत असलेल्या नायडू रुग्णालयाचे बाणेर येथे स्थलांतर करण्यासाठी हालचाल सुरू झाली असून, जागेची चाचपणी केली जात आहे. नायडू रुग्णालयाची नवीन इमारत वैद्यकीय महाविद्यालयासाठी वापरली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

...तर मान्यता शक्य

महापालिकेतील सूत्रांनी सांगितले की, वैद्यकीय प्रवेशासाठी ‘नीट’चा निकाल जाहीर झाला आहे, पण अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. महापालिकेने गेल्या महिन्याभरात वर्गखोल्या, त्यामधील साहित्य, प्रयोगशाळा साहित्य, प्रोजेक्टर व पुस्तक खरेदीसाठी स्थायी समितीने दीड कोटी रुपये मान्य केले आहेत, तसेच दुसऱ्या वर्षाचे वर्ग भरविण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करून नंतर बांधकाम सुरू केल्यास मान्यता मिळू शकते. ‘नीट’च्या दुसऱ्या फेरीतदेखील महाविद्यालयाच्या जागा दिसून प्रवेश करता येऊ शकतात, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

loading image
go to top